

अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २८ ः उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटी (एचएसआरपी) फिटमेंट सेंटरवर बसवून घेणे किंवा घरपोच सेवा असे दोन पर्याय वाहनचालकांना उपलब्ध करुन दिले आहेत. फिटमेंट सेंटरच्या अपॉइंटमेंटसाठी दोन-दोन महिने प्रतीक्षा करावी लागत असल्यामुळे वाहनचालक घरपोच सेवेला प्राधान्य देत आहेत. मात्र, एक-दीड महिने झाले तरी उच्च सुरक्षा वाहन नंबर प्लेट घरी येत नसल्याने वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
केंद्र सरकारने एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बसविणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार राज्य परिवहन विभागाने एक जानेवारीपासून ‘एचएसआरपी’ बसविण्याची सुविधा वाहनचालकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी तीन खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत राज्यातील ५६ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत ‘एचएसआरपी’ उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या कंपन्यांद्वारे वाहनचालकांना ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर फिटमेंट सेंटरवर जाऊन किंवा घरपोच सेवा घेण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. एचएसआरपी बसविण्याची पद्धत माहिती नसल्यामुळे बहुतांश वाहन चालक फिटमेंट सेंटरवर जाऊन एचएसआरपी बसवून घेत आहेत.
सव्वालाख चालकांकडून नोंदणी
पिंपरी चिंचवड शहरात एचएसआरपीसाठी १८ मार्च पर्यंत १ लाख ३४ हजार ४४५ वाहन चालकांनी ऑनलाइन नोंदणी केली असून २१ हजार ३९५ वाहन चालकांनी एचएसआरपी बसवून घेतले आहे. दिवसेंदिवस एचएसआरपी बसविणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. फिटमेंट सेंटरवर एचएसआरपी बसविण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचे वेटिंग करावे लागत आहे. त्यामुळे वाहनचालकही आता घरपोच सेवेचा पर्याय निवडत आहेत. घरपोच सेवेसाठी १२५ रुपये जादा शुल्क आकारले जात आहे. जादाचे शुल्क आकारुन पण वेळेत एचएसआरपीची घरपोच सेवा मिळत नसल्याचे दिसून येते.
एचएसआरपी अनुपलब्ध
एचएसआरपी फिटमेंट सेंटर सुरू होण्यापूर्वीच अपॉइंटमेंट घेतल्या जात आहेत. तर कधी अपॉइंटमेंट घेतलेल्या असूनही अचानक फिटमेंट सेंटर बंद होत आहेत. तर कधी अपॉइंटमेंटच्या दिवशी फिटमेंट सेंटरवर गेल्यावर एचएसआरपीच उपलब्ध नसते. त्यामुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. एचएसआरपीचा घोळ कधी संपणार ? असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.
मी २२ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन नोंदणी केली होती. घरपोच नंबर प्लेट बसविण्यासाठी १२ मार्च ही तारीख दिली होती. २७ मार्च आली तरी अजूनही नंबर प्लेट मिळाली नाही. ११ मार्च रोजी मला मेसेज आला की वाहनावर मोबाईल नंबर अद्ययावत (अपडेट) केलेला नाही. मोबाईल नंबर अपडेट करा. पण, मोबाईल नंबर अपडेट नव्हता; तर ऑनलाइन नोंदणी करुन कशी घेतली ?
- कल्याणी सदावर्ते, वाहनचालक
वाहन चालकांनी एचएसआरपीसाठी नोंदणी करण्यापूर्वी मोबाईल नंबर परिवहन विभागाच्या वाहन पोर्टलवर अपडेट आहे का ? याची खातरजमा करावी. नसेल तर अद्ययावत करावा. मोबाईल नंबर बंधनकारक आहे.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड आरटीओ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.