सर्वांगसुंदर गणेशमूर्ती बाजारपेठांमध्ये दाखल

सर्वांगसुंदर गणेशमूर्ती बाजारपेठांमध्ये दाखल

Published on

ढोल पथकांचा सराव, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग, घरोघरी तयारी आणि गजबजलेल्या बाजारपेठा... शहरातील या वातावरणामुळे गणरायाच्या आगमनाची चाहूल लागत आहे. गणेशोत्सव म्हणजे चैतन्य, आनंद, हर्षोल्हासाचे दिवस. अवघ्या आठवडाभरावर आलेल्या उत्सवामुळे शहरातील वातावरणही बाप्पामय झालेले आहे. सुंदर गणेशमूर्तींचे स्टॉल, सजावटीचे आकर्षक साहित्य आणि खरेदीसाठी गर्दी, सजावटीचे नवे ‘ट्रेंड’ ..या गणेशोत्सवाच्या वातावरणाचा आढावा घेणारी ‘आले गणराय’ ही वृत्तमालिका आजपासून...

पिंपरी, ता. १८ : लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा लाडका असणाऱ्या गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी घरोघरी दिसून येत आहे. दहा दिवस ज्याची पूजा करायची, अशा गणेशाची मूर्ती घेण्यासाठी बाजारपेठांमध्येही भक्त गर्दी करत आहेत. सुंदर, सुबक आणि हवी तशी मूर्ती घरी न्यावी, यासाठी आगाऊ नोंदणीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. मागणी पाहता शहरभर सध्या गणपती मूर्तींचे स्टॉल दिसून येत आहेत.

वस्त्रालंकारांनी सजवलेल्या मूर्तींना प्राधान्य
आपल्या घरी येणाऱ्या गणेशाची मूर्ती सर्वांत सुंदर व आकर्षक असावी, असे प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे मूर्तीची निवड अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. हे लक्षात घेता, मूर्तीकारही दरवर्षी निरनिराळ्या रुपातील गणपती घडवतात. या वर्षीही वस्त्रे असलेल्या, त्याच रंगसंगतीचा फेटा आणि अलंकार घातलेल्या मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये ‘चिकुमेट’ रंगातील म्हणजेच नैसर्गिक त्वचेचा रंग दिलेल्या मूर्तींनाही मोठी मागणी आहे. शाडू माती आणि ‘पीओपी’ या दोन्ही प्रकारांमध्ये या मूर्ती उपलब्ध आहेत. मात्र, ‘पीओपी’पाासून तयार केलेल्या मूर्तींचे भाव या वर्षी अधिक वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

शाडू मातीच्या मूर्तींना मागणी
शाडू मातीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तींमध्ये बालगणेश, म्हैसुरी प्रभावळ असलेला बालाजीच्या रुपातील गणेश, मोती रंगात रंगवलेला गणपती, विठ्ठलाप्रमाणे टिळा लावलेला माउली गणपती, फेटा घातलेला गणपती, केशरी रंगातील सिद्धीविनायकाची प्रतिकृती अशा मूर्तींना मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शाडू मातीमध्ये नऊ इंचापासून ते साडेतीन फुटांच्या मूर्ती उपलब्ध असून यांची किंमत ७०० रुपयांपासून पुढे आहे.

आम्ही मागील तीन वर्षांपासून अधिक मातीतील गणेश मूर्ती विकत आहोत. या मूर्तींना यंदा सर्वाधिक मागणी आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे नागरिक वळत आहेत.त्यामुळे घरगुती गणेशोत्सवासोबतच सोसायटी व मंडळांकडूनही आम्हाला बुकिंग येत आहेत.
- रागिणी लिमये, गणपती मूर्ती विक्रेत्या, निगडी प्राधिकरण

आम्ही दरवर्षी वेगळ्या रुपातील गणेशाची मूर्ती घरी आणतो. या वर्षी लालबाग किंवा दगडूशेठची प्रतिकृती घ्यायचा विचार करत आहोत. ड्रेपरी घातलेल्या गणेशाच्या मूर्तीही सुंदर आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्या महाग आहेत. पण, नवीन रंगसंगतीतील गणेश मूर्ती लोभस आहेत.
- चेतन ठाकरे, गणेशभक्त, पुनावळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com