डिजिटल मॅमोग्राफी व्हॅनद्वारे महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिर
पिंपरी, ता. १८ ः महापालिकेचा वैद्यकीय विभाग व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांगवी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी प्रसूतिगृह येथे महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात डिजिटल मॅमोग्राफी व्हॅनचा वापर करून महिलांची कर्करोग तपासणी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे व मेडिकल असोसिएशनच्या पीसीबीचे अध्यक्ष डॉ. दिलीप कामत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
मॅमोग्राफी व्हॅनमध्ये उच्च रिझोल्यूशन एक्स-रे तंत्रज्ञान, संगणकीय प्रतिमा प्रक्रिया प्रणाली, आणि तज्ज्ञ तांत्रिक कर्मचारी उपलब्ध असतात. यामुळे स्तनातील गाठ, बदल किंवा कर्करोगाची प्रारंभिक लक्षणे अगदी कमी डोसच्या किरणोत्सर्गाने अचूकपणे शोधता येतात. डिजिटल पद्धतीमुळे तपासणीचे परिणाम त्वरित मिळतात व त्यांचे संग्रहण पुढील उपचारासाठी सुलभ होते. या उपक्रमाद्वारे महिलांना मोफत तपासणीची सुविधा मिळाली. शिबिरात सत्तरपेक्षा अधिक महिलांनी तपासणी करून घेतली व स्तन कर्करोग प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन मिळविले.
या प्रसंगी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे, डॉ. ललित धोका, डॉ. मिलिंद सोनवणे, डॉ. प्रकाश रोकडे तसेच डॉ. रितू लोखंडे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी नोडल अधिकारी डॉ. वैशाली भामरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. करुणा साबळे, सांगवी रुग्णालयातील कर्मचारी व स्वयंसेविका यांनी मेहनत घेतली.
स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. डिजिटल मॅमोग्राफी व्हॅन सारखी आधुनिक साधने ग्रामीण व शहरी भागातील जास्तीत-जास्त महिलांपर्यंत पोहचावी हा आमचा मानस आहे. शिबिराच्या माध्यमातून तो प्रभावीपणे पूर्ण होत असल्याचे दिसत आहे.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका