संवाद माझा
सर्व ठिकाणी बसथांबे हवेत
विशालनगरच्या डीपी रस्त्यावरील नीता पार्क शेजारी नवीन बस थांबा केल्याने ऊन, पावसापासून संरक्षण मिळत आहे. पण, याच रस्त्यावरील इतर सर्व ठिकाणी बसथांब्यांवर अशी सुविधा देणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
- गोविंद गायकवाड, विशालनगर, वाकड
PNE25V40870
नियमित कचरा साफ करावा
चिंचवडगावातील केशवनगर परिसरातील स्पाईन रस्ता येथील पदपथावर कचरा साचला आहे. त्याची नियमितपणे साफसफाई करुन तो वापरण्यायोग्य करावा. महापालिकेने याबाबतीत दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
- रमेश देव, केशवनगर
E25V40865
भटक्या श्वानांचा बंदोबस्त करा
डुडुळगावमधील मंगलम पॅराडाईज, सिग्नेचर, इंद्रभूमी, नाथ रेसिडेन्सी परिसरात भटक्या श्वानांचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. दिवसभरात केव्हाही त्यांच्या झुंडी इकडून तिकडे भुंकत धावत असतात. दररोज सकाळी लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी सर्वच माता भगिनींची घाई गडबड चालू असते. त्यामुळे सर्वांनाच जीव मुठीत धरून चालावे लागते. तसेच रात्री - अपरात्री घराकडे परत येणाऱ्या नागरिकांवर श्वान भुंकत असतात. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असते. स्थानिक प्रशासनाने भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा.
- प्रफुल्ल बाबर, डुडुळगाव
PNE25V40869
चिंचवड रेल्वे स्थानकावर अस्वच्छता
प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचे चिंचवड रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. परंतु सध्या स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला दिसत आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोलचे कप, पानाफुलांचे अवशेष, खाद्यपदार्थांच्या पाकिटांचा ढीग अशा स्वरूपातील कचरा परिसरात साचलेला आहे. त्यामुळे केवळ स्थानकाचे सौंदर्य बिघडत नाही; तर प्रवाशांच्या आरोग्यासही गंभीर धोका निर्माण होतो. कचऱ्यामुळे डास, उंदीर व इतर कीटक वाढण्याची शक्यता असते. ही परिस्थिती टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्वच्छता मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवाव्यात. प्रवाशांनीही आपला कचरा कुंड्यांमध्ये टाकण्याची सवय लावावी.
- निर्गुण थोरे, चिंचवड
PNE25V40867
यमुनानगर रस्त्यांवर खड्डे
निगडी चौकात यमुनानगरला जाणाऱ्या रस्त्यावर खूप प्रमाणात खड्डे झाले आहेत. सिग्नल सुरू झाल्यानंतर सर्वांची जाण्यासाठी घाई असते. अचानक ब्रेक लावावा लागत असल्याने अपघाताची शक्यता आहे. शाळा, बँका जवळ असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरून नेहमी जात येत असतात. खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करावे.
- सागर डुबल, यमुनानगर, निगडी
E25V40864