नोकरीचे आमिष दाखवून डॉक्टरची फसवणूक
पिंपरी : औषध निर्मिती कंपनीत टेक्निकल मॅनेजरपदी नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका डॉक्टरची ७७ लाख ६२ हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना वाकड येथे घडली. याप्रकरणी डॉ. सुनील लक्ष्मण हरेर (रा. दत्त मंदिर रस्ता, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रवीण विनायक परीतकर (वय ६२, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता, पुणे), शिवा (दिल्ली कस्टम अधिकारी), मिसेस मिश्रा आणि ओलीवेरा मार्टिन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचा एचआर शिवा, दिल्ली कस्टम अधिकारी मिसेस मिश्रा, कंपनीचा संचालक ओलिवेरा मार्टिन या नावाच्या व्यक्तींनी बनावट नावे व बनावट वेबसाइट वापरून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांना कंपनीच्या टेक्निकल मॅनेजरपदी नोकरी देण्याचे आमिष दाखवले. मात्र, नंतर नोकरी देण्याचे आश्वासन पूर्ण न करता त्यांनी फिर्यादीची ७७ लाख ६२ हजार १४२ रुपयांची फसवणूक केली.
कोयत्याच्या धाकाने जिवे मारण्याची धमकी
पिंपरी : एका व्यक्तीला दोघांनी हाताने मारहाण करून कोयत्याचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना काळेवाडी येथील तापकीर चौक येथे घडली. याप्रकरणी शरबेज सरदार हुसैन (रा. मधुबन कॉलनी, थेरगाव) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित दत्ता भोरे (वय ३०, रा. श्री स्वामी समर्थ कॉलनी, रहाटणी) आणि किरण ईश्वर मिरगे (वय ३०, रा. मोरया कॉलनी, तापकीरनगर, काळेवाडी) यांना अटक केली आहे. आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. त्यानंतर दोघांनीही हातात कोयता घेऊन ‘तुला आता खल्लास करून टाकतो’ असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली.
गुंतवणुकीच्या बहाण्याने ११ लाखांची फसवणूक
पिंपरी : व्हॉट्सअपवर बनावट लिंक पाठवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एका व्यक्तीची ११ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे घडली. या प्रकरणी संजय चंद्रकांत बाबर (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या व्हॅट्सअपवर एका अनोळखी व्यक्तीने एक लिंक पाठवली. फिर्यादीने ती लिंक उघडल्यावर त्यांच्या फोनमध्ये एक ॲप डाऊनलोड झाले. त्यानंतर, ॲपद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सांगून आरोपींनी फिर्यादीला काही बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितले. फिर्यादींनी त्या खात्यांवर ११ लाख १५ हजार रुपये पाठवले. मात्र, नंतर त्यांना कुठलाही मोबदला न देता त्यांची फसवणूक करण्यात आली.
रावेत येथे गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक
पिंपरी : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करायला सांगून एका व्यक्तीचे ३१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना रावेत येथे घडली. याप्रकरणी पराग चंद्रकांत चव्हाण (रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादीला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ॲड करून घेतले आणि त्यांना एक बनावट ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले आणि त्यांच्याकडून ३१ लाख १६ हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतर कोणताही नफा न देता आणि गुंतवणूक केलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली.
पाणी बिलाच्या नावाखाली वीस लाखांची फसवणूक
पिंपरी : पाणी बिलाच्या नावाखाली एका कंपनीची २० लाख ३९ हजारांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना एमआयडीसी चिंचवड येथे घडली. याप्रकरणी गुरुचरणसिंग मस्सासींग संधु (रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर त्यांच्या कंपनीच्या नावे असलेल्या पाणी बिलाबाबत एमआयडीसीच्या नावाने पाणी बिलासंदर्भात एक मेसेज आला. चुकून तो मेसेज फिर्यादीकडून उघडला गेला. त्यानंतर, त्याच मोबाइल नंबरवरून फिर्यादीला फोन आला. त्यावर समोरच्या व्यक्तीने स्वतःला एमआयडीसी पाणी पुरवठा विभागातून बोलत असल्याचे सांगितले. त्याने कंपनीचे पाणी बिल आयडेंटिफिकेशन चार्जेस १३ रुपये शिल्लक असल्याचे सांगितले. फिर्यादीने त्यांचा फोन त्यांच्या अकाउंटंटकडे दिला. त्यानंतर, फिर्यादीच्या बँक खात्यातून एकूण २० लाख ३९ हजार १९८ रुपये कमी झाले.
---