चक्क हातावर चालत जीवनातील आव्हाने पेलण्याचे धैर्य

चक्क हातावर चालत जीवनातील आव्हाने पेलण्याचे धैर्य

Published on

बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. १९ : जालन्यातील ३० वर्षीय दत्ता अंकुश शिंदे यांनी अपंगत्वाला न जुमानता स्वत:च्या हिमतीवर यशाची नवी उंची गाठली आहे. पाचव्या महिन्यांत पोलिओमुळे त्याच्या दोन्ही पायांना ७८ टक्के अपंगत्व आले. तरीही, त्याचा बाऊ न करता किंवा न्यूनगंड मनात न बाळगता चक्क हातावर चालत त्यांनी जीवनातील आव्हाने पेलण्याचे धैर्य दाखवले आहे. जिद्दी आणि मेहनतीने त्यांनी केवळ स्वत:चे आयुष्यच नव्हे; तर आपल्या कुटुंबाचे भविष्यही उज्ज्वल करत आहे.
दत्ता यांची कथा ही सामान्य कुटुंबातून सुरू होते. त्यांचे आई-वडील मोलमजुरी करतात; तर तीन मोठ्या बहिणींच्या पाठिंब्याने त्यांनी जालना येथील अपंग निवासी संस्थेत जिद्दीने बीएपर्यंत शिक्षण पूर्ण केले. सध्या पिंपरी चिंचवड शहरात दत्ता हे झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करत आहे.

कठीण सुरुवात; पण अढळ विश्वास
घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणानंतर नोकरी करण्याचा निर्णय दत्ता यांनी घेतला. नवी मुंबईतील ऐरोली येथे डायपर बनवणाऱ्या कंपनीत त्यांना पहिली नोकरी मिळाली. याच काळात त्यांची ओळख फ्रेंड फाउंडेशन या संस्थेशी झाली. या संस्थेचे अध्यक्ष अनुपम नेवगी यांनी दत्ता यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन दिले. फाउंडेशनच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी तीनचाकी इलेक्ट्रिक बॅटरीवरील वाहन मिळाले. त्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले. या वाहनाने त्यांना स्वावलंबी बनविले आणि नव्या संधी खुल्या झाल्या.

खडतर प्रवास
सुरुवातीला दत्ता यांनी जालना येथे झोमॅटोवर ऑर्डर डिलिव्हरीचे काम केले. मात्र, रस्त्यांची खराब अवस्था आणि लांब अंतरामुळे एका ऑर्डरमागे फक्त तीस रुपये मिळायचे. मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी यामुळे त्यांनी उद्योगनगरीची वाट धरली. पिंपरी चिंचवडमध्ये झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर म्हणून नव्याने सुरुवात केली. आता ते दिवसाला सुमारे दीड हजार रुपये कमावतात. त्यातून ते स्वत:चा, भाड्याची खोली आणि घरच्यांचा खर्च भागवत आहेत.
दत्ता यांच्या या प्रवासात फ्रेंड फाउंडेशन आणि अनुपम नेवगी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांना केवळ आर्थिक स्वावलंबनच नाही; तर आत्मविश्वास आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळाला. दत्ता यांची कहाणी ही अपंगत्वाला मर्यादा न मानता स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्यांसाठी एक प्रेरणा आहे.

एखाद्याला आलेले अपंगत्व ही अडचण नाही. एक आव्हान आहे. मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाले; तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रबळ इच्छाशक्ती आणि योग्य पाठबळाने कोणतीही अडचण मोठी नाही.
- दत्ता शिंदे, दिव्यांग तरुण

PNE25V41184

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com