माय फ्रेंड श्रीगणेशा सहा

माय फ्रेंड श्रीगणेशा सहा
Published on

माय फ्रेंड श्रीगणेशा सहा ः पीतांबर लोहार
--
वक्रतुंड

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।
अशी गणपतीची प्रार्थना आपण करतो. का करतो? अशी प्रार्थना आपण, कीर्तनकार महाराज बोलत होते. ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ’ म्हणजे हे वक्रतुंड म्हणजे वक्र किंवा वाकडी सोंड असलेला, विशाल काया असलेला, विशाल शरीर असलेला, करोडो सूर्याप्रमाणे प्रखर तेज असलेला, असा गणपती आहे. केवळ तो विशाल नाही, केवळ त्याची सोंड वक्र नाही, केवळ सूर्याप्रमाणे त्याचे तेज प्रखर नाही, तर ‘निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा’ असे साकडे त्याला घातले जाते. म्‍हणजे, ‘हे देवा, माझ्या सर्व कामांमधून सर्व विघ्ने दूर कर. माझे कार्य निर्विघ्नपणे दूर कर,’ असे साकडे घालताच भक्तांच्या हाकेला धावून येणारा, भक्तांची विघ्ने चुटकी सरशी दूर करणारा तो गणपती, असे त्याचे वर्णन केले जाते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।...’ या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. असे केल्यामुळे कामात यश मिळते आणि कोणतेही विघ्न येत नाही, अशी भक्तांची श्रद्धा आहे. लाडक्या गणपती बाप्पावर विश्‍वास आहे.
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
जो भक्तांच्या हाकेला धावून येतो, भक्तांवरील विघ्ने दूर करतो, तो गणपती रिकाम्या हाताने येईल का? कीर्तनकार महाराजांचा श्रोत्यांना प्रश्न. श्रोत्यांमधून ‘नाही’ असा आवाज घुमला. कीर्तनकार महाराज म्हणाले, ‘नाही ना?’ लाडका गणपती रिकाम्या हाताने येणार नाही ना? मग त्याच्या हातात काय असेल? तर त्याच्या हातात शस्त्र असतील. आयुधे असतील. मग, ही शस्त्र किंवा आयुधे कोणती आहेत? तर असुरांचा विनाश करण्यासाठी गणपतीच्या हातात विविध आयुधे आहेत. त्याचे वर्णन तुकोबारायांनी केले आहे, अभंगाच्या पहिल्या चरणात.
असे म्हणताच गायकांनी कीर्तनाच्या निरुपणासाठी घेतलेल्या अभंगाचे पहिले चरण गायला सुरुवात केली,
धरोनियां फरश करी।
भक्तजनाचीं विघ्नें वारी।।
ऐसा गजानन महाराजा।
त्याचें चरणीं हालो लागो माझा।।
त्या गायकाच्या पाठी अन्य टाळकऱ्यांनी साथ दिली. दोन-तीन वेळा ‘धरोनियां फरश करी।...’ या चरणाची आळवणी झाल्यानंतर कीर्तनकार महाराजांनी थांबण्याचा इशारा केला. गायक साधकांनी गायन थांबवले, वादक वादन करायचे थांबले. महाराज बोलू लागले, ‘धरोनियां फरश करी। भक्तजनाचीं विघ्नें वारी।। असे जगद्‍गुरू तुकोबारायांनी म्हटले आहे. ‘धरोनियां फरश करी।’ म्हणजे गणपतीच्या हातामध्ये फरश आहे. म्हणजे तलवारीसारखे आयुध आहे. हत्यार आहे. ते कशासाठी आहे. तर, भक्तांची विघ्ने दूर करण्यासाठी.’ अशा भक्तांची विघ्ने दूर करणाऱ्या गपणतीला संकटनाशकही म्हटले जाते. म्हणूनच गणपतीच्या आरतीत ‘सुखकर्ता, दुःखहर्ता वार्ता विघ्नाची’ असे म्हटले आहे. आरतीच्या चालीमध्ये दोन्ही हातांनी टाळी वाजवत कीर्तनकार महाराजांनी आरतीचे पहिले पद म्हटले आणि म्हणाले, ‘गणपती हा सुखकर्ता आहे, भक्तांचे दुःखहर्ता आहे.’ शिवाय, ‘विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय। लंबोदराय सकलाय जगद्धिताय।...’ अशी प्रार्थनाही म्हटली जाते. अशा या गणपतीच्या हातात केवळ फरशच नाही तर अन्य शस्त्रही आहेत. ती म्हणजे अंकुश, पाश. अंकुश हे हत्तीला वश करण्यासाठी वापरले जाणारे हत्यार आहे. इथे मात्र, अंकुश म्हणजे भक्तांना योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी वापरले जाणारे आयुध, असा अर्थ अभिप्रेत असावा. जसे की, जगद्‍गुरू संत तुकाराम महाराजांच्या शब्दांत, ‘नाठाळांच्या माथी हाणू काठी’ तसे नाठाळांना वठणीवर आणण्यासाठी गणपतीच्या हातात असलेले आयुध म्हणजे अंकुश आहे. गणपतीचे दुसरे शस्त्र आहे पाश. हा एक फासाचा प्रकार आहे. आपल्या व्यावहारिक जीवनात त्याचा अर्थ आपण, ज्याच्यामुळे भक्तांना मोह आणि वाईट विचारांपासून दूर ठेवण्याचे आयुध म्हणजे पाश आहे, असे समजूया. गणपतीच्या आयुधांमध्ये परशु किंवा फरशचाही समावेश आहे आणि गणपतीच्या एका हातात नेहमी मोदक दाखवला जातो. मोदक हा गणपतीचा आवडीचा पदार्थ आहे. जो गणपतीला खूप प्रिय आहे. तो भक्तांना आनंद आणि समृद्धी देतो. म्हणजेच भक्तांना योग्य मार्गावर चालण्यासाठी, वाईट विचारांपासून दूर राहण्यासाठी आणि
जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची साधने म्हणजे आयुधे आहेत. या आयुधांच्याच आधाराने ‘धरोनियां फरश करी। भक्तजनाचीं विघ्नें वारी।। ऐसा गजानन महाराजा। त्याचें चरणीं हालो लागो माझा।।’, असे जगद्‍गुरू तुकोबारायांचे वर्णन केलेले असावे.
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com