माय फ्रेंड श्रीगणेशा सात

माय फ्रेंड श्रीगणेशा सात

Published on

माय फ्रेंड श्रीगणेशा सात ः पीतांबर लोहार
--
गणाधीश

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी ज्ञानोबाराय आणि जगद्‍गुरू जगद्‍वंदनीय संत तुकोबाराय यांच्याप्रमाणेच समर्थ रामदास स्वामी यांनीही गणपतीचे वर्णन केलेले आहे, असे सांगून कीर्तनकार महाराज म्हणाले, ‘समर्थांची ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती सर्वपरिचित आहेच. पण, त्यांनी रचलेल्या मनाचे श्लोकमध्येही गणपतीचे सुंदर असे वर्णन आहे. विशेषतः मराठी भाषेचे लालित्य त्या श्लोकांमध्ये दिसून येते. आपल्या मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पण, आमची मराठी ही पूर्वीपासूनच अभिजात होती, आहे आणि राहणार आहे, यात शंका नाही.
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
घराघरांमध्ये आळवली जाणारी ‘सुखकर्ता, दुखहर्ता’ ही गणपतीची आरती जशी प्रिय आहे. तशी समर्थ रामदास स्वामी यांचा गणपती विषयीचा श्लोकही घराघरांमध्ये म्हटला जात आहे. तो श्लोक समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोध ग्रंथामध्ये प्रथमस्थानी आहे. आणि त्या श्लोकाच्या पहिल्या दोन ओळीतच गणपतीचे वर्णन समर्थांनी केलेले आहे.
गणाधीश जो ईश सर्वागुंणांचा।
थोड्या उंच स्वरात कीर्तनकार महाराज म्हणाले,
गणाधीश जो ईश सर्वागुंणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गणाचा।।
गणाधीश जो ईश सर्वागुंणांचा, म्हणजे सर्व देवतांचा अधिपती गणपती आहे. हा गणपती सर्व ज्ञात अज्ञात गुणांचा ईश्वर अधिपती असून, निर्गुण निराकार परब्रह्म आहे.
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
निर्गुण निराकार परब्रह्म असलेल्या गणपतीला काय, काय? प्रिय आहे. याचे वर्णन तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात,’ असे म्हणताच, गायकांनी अभंगाचे दुसरे चरण गायला सुरवात केली.
सेंदुर शमी बहुप्रिय ज्याला ।
तुरा दुर्वांचा शोभला ।।
ऐसा गजानन महाराजा ।
त्याचें चरणीं हालो लागो माझा ।।
गायकांनी ‘धरोनियां फरश करी।...’ या अभंगाचे दुसरे चरण गायले. त्यानंतर कीर्तनकार महाराजांनी निरूपण सुरू केले. ते म्हणाले, ‘तुकोबाराय गणपतीचे वर्णन करताना म्हणतात, सेंदुर शमी बहुप्रिय ज्याला । तुरा दुर्वांचा शोभला ।।...’ म्हणजे शेंदूर आणि शमी गणपतीला खूप प्रिय आहे. त्याच्या डोक्यावर दुर्वांचा तुरा शोभून दिसतो. श्रीगणेश अथर्वशीर्षामध्येही गणपतीला प्रिय असलेल्या वस्तुंचे वर्णन केले आहे. अथर्वशीर्षाच्या नवव्या परिच्छेदात म्हटले आहे की,
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्।
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं।
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।
रक्तगंधानुनिप्तांगं रक्तपुष्पैःसुपूजितं।
भक्तानुकाम्पिनं देवं जगत् कारणमच्युतम्।
आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृतेः पुरुषात्परं।
एवं धायति यो नित्यं स योगी योगिनां वरः।।
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्। रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं।..
म्हणजे हे गणराया तू एकदंत आहेस. तुला चार हात आहेत. पाश आणि अंकुश असे शस्त्र तू हातांमध्ये धारण केली आहेत. तुझा एक दात अर्ध आहे. तू वर म्हणजे आम्हाला, भक्तांना आशीर्वाद देणारा आहेस. तुझे वाहन मूषक आहे किंवा तू मूषक चिन्ह असलेला ध्वज एका हातात घेतला आहेस. तुझा वर्ण तांबडा आहे. तू त्याच रंगाची म्हणजे रक्तवर्णीय वस्त्रे परिधान केली आहेत. किंवा तुला तांबड्या रंगाची वस्त्रे आवडतात. तू कपाळी तांबडा गंध लावला आहेस. तुला तांबड्या रंगाचीच फुले आवडतात किंवा तांबड्या रंगांचे म्हणजे जास्वंदीचे फूल वाहून तुझी पूजा करतात. भक्तांबाबत तुला अनुकंपा वाटते. सर्वजगाचे कारणही तूच आहेस. या सृष्टीच्या प्रारंभापूर्वीपासूनच तू आहेस. त्यामुळे प्रकृती आणि पुरुष यांच्यातून तू श्रेष्ठ आहेस. म्हणूनच तुझे नेहमी, निरंतर ध्यान करतो, तो योगी सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ ठरतो. त्यामुळेच गणपतीला पूजेतही अग्रस्थानी मान आहे. नवीन घर घेतलेले असो की नवीन वाहन, सत्यनारायण महापूजा असो वा कोणताही धार्मिक विधी, अशा प्रत्येक वेळी गणपतीचे पूजन केले जाते. अगदी ‘श्रीगणेशाय नमः’, ‘ओम् स्वस्ति
श्री गणपतये नमः’ अशा प्रकारे नामस्मरण करून सुद्धा आपण गणरायाचे पूजन करतो आणि पुढील कार्याला निघतो. अशा या गणपतीचे देहू येथील संत तुकोबारायांनीही, ‘ऐसा गजानन महाराजा। त्याचें चरणीं हालो लागो माझा।।’ अशा शब्दांत स्मरण केले आहे.
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com