वायसीएममध्ये वैद्यकीय प्रशिक्षणाची संधी
पिंपरी, ता. २५ ः खासगी वैद्यकीय संस्थेत वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या किंवा घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि महापालिकेच्या इतर रुग्णालयांत निरीक्षक म्हणून कामकाज करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. यासह विविध आवश्यक विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली.
स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विषय प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी बैठकीत ठेवले होते. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर आदी उपस्थित होते. खासगी व शासकीय संस्थेतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमीओपॅथी पदवी अभ्यासक्रम, भौतिकोपचार, व्यवसायोपचार यांसारखे निमवैद्यकीय पदवी अभ्यासक्रम व परिचर्याविषयक पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणासाठी राज्य शासनाने दिलेल्या अटी-शर्तींनुसार करारनामा करण्यात येणार आहे. याअंतर्गत वैद्यकीय व संबंधित क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या किंवा शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अल्पदरात महापालिका रुग्णालयांमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या प्रशिक्षणाअंतर्गत विद्यार्थ्यांना निरीक्षक म्हणून कामकाज करण्याची संधी मिळणार आहे.
कोण करू शकतात अर्ज?
खासगी वैद्यकीय संस्थेत बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, एमबीबीएस, एमडी, एमएस, पीजी डिप्लोमा, डीएनबी, डीएम, एमसीएच, एमडीएस, एमएसडब्ल्यु, एमबीए (हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन), तसेच समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.
प्रशिक्षण कालावधी ः एक ते सहा महिने
शुल्क ः भारतीय विद्यार्थ्यांसाठी प्रतिदिन प्रतिखाट ३०० रुपये (महिन्याला नऊ हजार), परदेशी विद्यार्थ्यांसाठी तीनपट, दरवर्षी प्रतिदिन शुल्कामध्ये १० टक्के वाढ, एक महिन्याचे शुल्क आगाऊ भरावे लागेल
प्रक्रिया ः विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर रुग्णालयातील गरज व उपलब्धतेनुसार परवानगी मिळेल. महापालिकेशी करार करावा लागेल. परवानगीनंतर प्रशिक्षणाची संधी मिळेल.
अन्य मंजूर विषय
- पिंपळे निलख सर्व्हे क्रमांक ४२, २, ५, ७ मधून जाणारा १२ मीटर रुंद डीपी रस्ता विकसित करणे
- निसर्गकवी संत बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात पांढरे उंदीर पुरविणे
- भारत विकास शिक्षण संस्थेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना महापालिका रुग्णालयांची संलग्नता मिळविणे
- अ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील वापरात नसलेले, दुरवस्था झालेले व मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहांचा सर्व्हे करून पाडणे
- चिखलीतील अष्टविनायक चौक, पाटीलनगर, बागवस्ती भागातील रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने दुरुस्ती करणे
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

