देहूत स्वीकृत सदस्य निवडणुकीत गोंधळ

देहूत स्वीकृत सदस्य निवडणुकीत गोंधळ

Published on

देहू, ता. २५ : देहू नगरपंचायतीच्या दोन स्वीकृत सदस्यपदासाठी मंगळवारी (ता.२५) निवडणूक झाली. यादरम्यान इच्छुकांना डावलल्याचा आरोप करत देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. विषयाचे गांभीर्य ओळखून पोलिसांना पाचारण करावे लागले. तर; इच्छुकांनी सरळ आमदार सुनील शेळके यांच्याशी संपर्क साधून नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पुढील काही दिवसांत पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता आहे.

हवेलीचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. यावेळी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, सर्व सदस्य उपस्थित होते. या नगरपंचायतीत सतरा सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. येथे पक्षाची एकहाती सत्ता असल्याने दर सहा महिन्यांनी स्वीकृत सदस्यांची निवडणूक होते. मंगळवारी या निवडणुकीसाठी देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमनाथ चव्हाण, युवक संघटनेचे अध्यक्ष योगेश मोरे, शंकर काळोखे, अमित टिळेकर हे या पदासाठी इच्छुक होते. मात्र, फक्त टिळेकर यांचा अर्ज दाखल झाला, तर एक अर्ज बाद झाला. त्यामुळे अन्य तिघे इच्छुक आक्रमक झाले.
याबाबत सोमनाथ चव्हाण म्हणाले, ‘‘आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आम्हांला संधी मिळणार असा शब्द होता. मात्र, ऐनवेळेस आमचे अर्जच दाखल झाले नाहीत. त्यामुळे आम्ही आमदार शेळके यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे पुन्हा निवडणूक होणार आहे.’’
याबाबत प्रांताधिकारी डॅा. यशवंत माने म्हणाले, ‘‘जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. एक उमेदवार अमित टिळेकर यांचा अर्ज वैध ठरला. मात्र, गटनेते योगेश परंडवाल यांनी निवडणूक स्थगित करण्याची मागणी केली. परंतु; एकदा प्रक्रिया सुरू झाल्यावर स्थगित करता येत नाही. तसा अहवाल आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे देणार आहोत.’’
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com