औद्योगिक पट्ट्यात अघोषित भारनियमन

औद्योगिक पट्ट्यात अघोषित भारनियमन
Published on

पिंपरी, ता. ३० : वीज वाहिनीमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर व लगतच्या ‘एमआयडीसी’ क्षेत्रात तासंतास वीजपुरवठा खंडित होत आहे. औद्योगिक कंपन्यांकडून मागणी वाढल्याने अतिरिक्त ताण येत असून वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. यामुळे उद्योजकांना आठवड्यातून दोन ते तीन दिवस विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एमआयडीसी, हिंजवडी, चाकण, तळेगाव, तळवडे या परिसरामध्ये आयटी तसेच, विविध उत्पादन कंपन्या आहेत. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनांनी भोसरी कार्यकारी अभियंता यांना विजेची समस्या सोडविण्याची मागणी केली होती. ‘‘भोसरी परिसरामध्ये वेगवेगळ्या कामासाठी खोदाई सुरू असून, यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे,’’ असे अधिकारी सांगत आहेत. तर दुसरीकडे, विजेची मागणी वाढल्याने अतिरिक्त ताण येत असून विजेच्या वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड होत आहेत.
मुळशी परिसरामध्ये आग लागल्याने हिंजवडी आयटी कंपनी तसेच, घरगुती वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर दोन दिवसानंतर चिंचवड ते उर्से यादरम्यान वीज बिघाड झाला. परिणामी, तळेगाव ते चाकण या वाहिनीमध्ये अतिरिक्त ताण आल्याने वीज पुरवठा बंद करावा लागला. त्याचा फटका चाकण परिसरातील उद्योजकांना बसला. दरम्यान, विविध उपकेंद्रे वाढवण्याचे प्रस्ताव महापारेषणकडे प्रलंबित आहेत. मात्र, जागेचे आणि संबंधित महापालिका, नगरपरिषद यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळत नसल्याने हे काम रखडले आहे. त्यामुळे विविध उपकेंद्र आणि वाहिन्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. त्याचा फटका घरगुती वीज ग्राहकांना बसत आहे.

पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती व्हावी
एप्रिल आणि मे संपल्यानंतर जून, जुलैदरम्यान पावसाळा सुरू होईल. या काळात विद्युत विषयक कामे करताना अडथळे निर्माण होतात. यासाठी महावितरणला येत्या दोन महिन्यांत कामाचा निपटारा करावा लागणार आहे. अन्यथा उद्योजकांना पावसाळ्यातही वीज समस्यांना सामोरे जावे लागेल. मार्च उलटल्यानंतर देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.


तळेगाव एमआयडीसी परिसरात वारंवार वीज जाते. सिंगल फेजिंग सुरू राहते. मशिनला पुरेसा विद्युत पुरवठा होत नाही. मागील दोन ते तीन महिन्यांपासून वीज जाण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. ग्राहकांची मागणी पूर्ण करता येत नाही. विद्युत संचय (पॉवर बॅकअप) यंत्रणेवर मशिनची क्षमता भागत नाही. वीज सुरळीत सुरू राहिल्यानंतर औद्योगिक उत्पादनावर ताण येणार नाही.
- अशोक विसपुते, उद्योजक प्रतिनिधी

हिंजवडी एमआयडीसी भागात अघोषित भारनियमन सुरू आहे. महावितरण कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जाते. परंतु, दुरुस्त करण्यासाठी अनेक तास वेळ लागतो. तोपर्यंत आम्हाला उत्पादन थांबवावे लागते. छोट्या उद्योगासाठी बॅकअप यंत्रणा परवडत नसल्यामुळे आम्ही ती ठेवत नाही. तांत्रिक बिघाड होणार नाही, याची काळजी घेऊन नियमित वीजपुरवठा करणे अपेक्षित आहे.
- सुरेश पारखी, उद्योजक

चाकण एमआयडीसीत वीज पुरवठा वारंवार खंडीत होते. यंत्रणेचा खोळंबा होतो. सबस्टेशन असूनही नियमित वीजपुरवठा केला जात नाही. तांत्रिक बिघाड होत असेल, तर संबंधित यंत्रणा सक्षम ठेवणे गरजेचे आहे. औद्योगिक क्षेत्राला कायमस्वरुपी विजेचा पुरवठा केल्यास उत्पादनात वाढ होऊन ग्राहकाच्या मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होईल.
- उदयसिंग येळे, उद्योजक

एमआयडीसी भागातील विद्युत पुरवठ्यावर वारंवार दाब येतो. तांत्रिक बिघाड होऊन विद्युत पुरवठा खंडीत होतो. तांत्रिक बिघाड दुरुस्त करुन पुरवठा पुन्हा सुरळीत केला जातो. एमआयडीसीने सबस्टेशन उभारण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन द्यावी. त्याठिकाणी सबस्टेशन उभे करुन त्यांना सुरळीत वीज पुरवठा करणे शक्य होईल.
- अतुल देवकर, कार्यकारी अभियंता, महावितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com