सहकारी संस्थांच्या निवडणुकीला हिरवा कंदील
प्रदीप लोखंडे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १८ : लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना अखेर राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. शासनाने स्थगिती दिलेल्या संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा आदेश चार जानेवारी रोजी दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत येणाऱ्या उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्यावतीने निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उपनिबंधक सहकारी संस्था ३ आणि ६ या दोन्ही कार्यालयांतर्गत रखडलेल्या एकूण ५१६ संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य सरकारने रिक्त होणाऱ्या पदांवर लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये पदाधिकारी किंवा संचालक यांची निवड किंवा नियुक्ती करणे योग्य होणार नसल्याचे कळविले होते. सरकारी आदेशाचे काटेकोर पालन व्हावे, असेही राज्य सरकारने कळवले होते. त्यानुसार राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यांनी ब, क, ‘ड’ आणि ‘ई’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक स्थगित केली होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील उपनिबंधक सहकारी संस्था तीन आणि सहा कार्यालयांतर्गत ५१६ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ‘ब्रेक’ मिळाला होता. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाल्याने या संस्थांच्या निवडणुकांना आणखीन विलंब झाला होता. मात्र आता शासनाने ४ जानेवारी रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुकीची बंदी उठवली आहे.
निवडणूक प्रक्रियेला सुरुवात
सहकारी संस्थांवर निवडणूक प्रक्रियेद्वारे संचालक मंडळाची नियुक्ती करून त्याद्वारे संस्थेचा कारभार चालविला जातो. निवडणुकीचा कार्यक्रम उपनिबंधक सहकारी संस्थांच्या कार्यालयांतर्गत पार पाडला जातो. त्यामुळे शहरातील दोन्ही कार्यालयांकडून निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. उपनिबंधक सहकारी संस्था तीन या कार्यालयांतर्गत एकूण ५९ सहकारी संस्थांची निवडणूक रखडलेली होती. त्यापैकी आता ४६ संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर उपनिबंधक सहकारी संस्था सहा या कार्यालयांतर्गत एकूण ४५७ संस्थांची निवडणूक रखडली होती. त्यापैकी १५ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. उर्वरित संस्थांची टप्प्याटप्प्याने निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.
उपनिबंधक सहकारी संस्था - तीन अंतर्गत समाविष्ट भाग
उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर (३) अंतर्गत चिंचवड, पिंपळे गुरव, नवी सांगवी, पिंपळे सौदागर आदींसह चिंचवड विधानसभा मतदारसंघातील बहुतांश भागाचा समावेश होतो.
उपनिबंधक सहकारी संस्था - सहा अंतर्गत समाविष्ट भाग
उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर सहा अंतर्गत रावेत, किवळे, मामुर्डी, दिघी, आकुर्डी, दापोडी, देहू, मोशी, भोसरी, चऱ्होली, चिखली, कासारवाडी, तळवडे, चिंचवड, वडमुखवाडी, डुडुळगाव, फुगेवाडी, निगडी, बोपखेल, चोविसावाही आदी भागांचा समावेश होतो.
उपनिबंधक संस्थांबाबत...
अ. क्र. : - सहकारी संस्था ३ - सहकारी संस्था ६
१) निवडणूक रखडलेल्या सहकारी संस्था - ५९ - ४५७
२) निवडणूक प्रक्रिया चालू असलेल्या - ४६ - १५
गृहनिर्माण अथवा इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकर घेणे आवश्यक आहे. अनेक वेळा या निवडणुका जवळ-जवळ वर्षभर लांबणीवर पडतात. तसेच शासनाने निवडणुका घ्यायला सांगितले असले तरी उपनिबंधक कार्यालयांकडे कर्मचाऱ्यांच्या संख्येचा अभाव असतो. त्यामुळे पत्र देऊनही निवडणुका उशिरा होतात. ही प्रक्रिया जलद गतीने व्हावी.
- संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-चऱ्होली, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग फेडरेशन
स्थगित झालेल्या निवडणुका घेण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सध्या ५९ संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. त्यापैकी ४६ संस्थांची प्रक्रिया चालू आहे. उर्वरित संस्थांचीही प्रक्रिया राबवली जाईल.
- पंकज राऊत, जनमाहिती अधिकारी, उपनिबंधक सहकारी संस्था (३)
कार्यालयांतर्गत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एकूण ४५७ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबली होती. त्या टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. सध्या १५ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
- मुकुंद पवार, उपनिबंधक, उपनिबंधक सहकारी संस्था (६)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

