औद्योगिक तक्रार निवारणासाठी आता स्वतंत्र पथक प्रमुखपदी सहायक पोलिस आयुक्त ः कार्यक्षेत्र आयुक्तालय राहणार
पिंपरी, ता. १८ : उद्योगधंद्यांना चालना मिळण्यासाठी उद्योगस्नेही वातावरण निर्मिती व उद्योजकांच्या अडीअडचणीवर तात्काळ कार्यवाही होण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत आता स्वतंत्र औद्योगिक तक्रार निवारण पथकाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. या पथकाचे प्रमुख सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे राहणार आहेत. लवकरच पथकात इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
या अगोदर खंडणी विरोधी पथकांतर्गत औद्योगिक तक्रार निवारण पथकाचे कामकाज सुरु होते. या कक्षाचे प्रमुख पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी होते. दोन पथकाचे एकत्र कामकाज असल्याने कोणत्यातरी एका पथकासाठी पूर्ण वेळ देणे शक्य होत नव्हते. दरम्यान, आता औद्योगिक क्षेत्रातील तक्रार निवारणासाठी पथकाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. या औद्योगिक पथकाचे कार्यक्षेत्र संपूर्ण पिंपरी चिंचवड आयुक्तालय असून, औद्योगिक आस्थापना संदर्भात घडलेले गुन्हे या पथकाकडे तपासासाठी घेण्यात येतील. औद्योगिक क्षेत्रात खंडणी मागणे, औद्योगिक वसाहतीत अशांतता माजवणे, यासारखे गुन्हे होणार नाहीत, याबाबत पथकाकडून प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. औद्योगिक तक्रार निवारण पथकाचे प्रमुख हे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्या मार्फत पोलिस आयुक्तांना अहवाल सादर करतील.
गुन्हा दाखलचे प्रमाण अत्यल्प..!
औद्योगिक क्षेत्रातील तक्रारींसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खंडणी विरोधी पथकांतर्गत २१ मार्च २०२३ रोजी औद्योगिक तक्रार निवारण पथक कार्यान्वित केले. या पथकामुळे औद्योगिक क्षेत्रात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र, या पथकाकडे आतापर्यंत म्हणजेच २२ महिन्यांत केवळ अकरा तक्रारी आल्या असून, त्या तक्रारीच्या आधारे गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हा दाखलचे हे प्रमाण अत्यल्प आहे. दरम्यान, आता स्वतंत्र पथक स्थापन झाल्यानंतर तरी उद्योगांना अधिक सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उद्योजकांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

