चिखलीच्या सुनियोजित विकासात योगदान

चिखलीच्या सुनियोजित विकासात योगदान

Published on

सकाळ वृत्तसेवा : अनंत काकडे

इंट्रो ः चिखलीच्या विकासामध्ये सुनियोजित पद्धतीने विकसित होणाऱ्या ऐश्वर्यम कोर्टयार्ड सारख्या अनेक सोसायट्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. सोसायटीच्या सदस्यांमध्ये नोकरदार, व्यापारी, डॉक्टर, अभियंते, उद्योजक, सरकारी कर्मचारी, वकील, शिक्षक, साहित्यिक अशा सर्व क्षेत्रांतील लोकांचा समावेश असून विविध जाती, धर्म आणि राज्यांतील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. पाण्याचा पुनर्वापर, सेंद्रीय खताची निर्मिती, वीज बचतीसाठी सौर उर्जा, बंदिस्त गॅसवाहिनीद्वारे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा आदी सोयी-सुविधा सोसायटीकडून सदस्यांना दिल्या आहेत. याशिवाय सर्व प्रकारचे उपक्रम सदस्यांकडून उत्साहात राबविले जातात.
-----------------
चिखली परिसराचा जसा नियोजन पद्धतीने विकास होण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये चिखली ते साने चौक याच्या अगदी मध्यभागी असलेल्या ऐश्वर्यम कोर्टयार्ड या सोसायटीचा वाटा महत्त्वाचा राहिला आहे. जसजसा चिखली परिसराचा विकास होण्यास सुरुवात झाली. तसा या परिसराचा चेहरामोहरा बदलला. परिसरात अनेक सोसायटी उभ्या राहिल्या.

एकोप्याची भावना
ऐश्वर्यम कोर्टयाड सोसायटीमध्ये सुमारे ५६५ सदनिका असून तेथे सर्व भागांतून आलेले नागरिक राहतात. त्यामुळे बहुभाषिक अशी या सोसायटीची ओळख निर्माण झालेली आहे. कोणत्याही सदस्याला काही अडचण आली असेल, सोसायटीतील सर्व सभासद त्याला मदत करतात तसेच सोसायटीमधील कोणतीही समस्या एकत्र बसून चर्चा करून ती सोडवली जाते. त्यामुळे सभासदांमध्ये एकोप्याची भावना निर्माण झालेली आहे. सोसायटीच्या अध्यक्षांबरोबरच सर्व सदस्य सोसायटीच्या प्रत्येक उपक्रमांत आणि समस्या सोडवण्यासाठी सहभागी होत असतात.

गणेशोत्सव, नवरात्रीचा उत्साह
गणेशोत्सव दहा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यामध्ये श्रींची भव्य मूर्ती, आरास आणि दररोज होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे उत्सवाचे वैशिष्ट्य असते. विविध संगीत खुर्ची विविध वक्तृत्व, निबंध स्पर्धा, खेळ, धार्मिक श्लोक पठण आणि मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि विविध बक्षीसेही वाटली जातात. नवरात्र उत्सवामध्ये दांडिया तसेच महिलांसाठी इतर कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. याशिवाय, एक मे महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सोसायटीमध्ये ख्रिश्चन बांधवांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे नाताळाचाही उत्साह औरच असतो. त्यामध्ये सर्वधर्मीय नागरिक सहभागी होताना दिसतात. दिवाळीचा फराळानेही सदस्यांमधील गोडवा वाढीस लागत असतो.

सांडपाण्यावर प्रक्रिया
पाण्याचा अपव्यय टाळावा आणि सर्व सदस्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे यादृष्टीने सोसायटीकडून वापरासाठी आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दररोज वाया जाणाऱ्या संपूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जातो. सोसायटीमध्ये दररोज जवळपास दीड लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरात आणले जाते. हे पाणी मुख्यत्वे स्वच्छतागृहे आणि उद्यानासाठी वापरले जाते. परिणामी, पाणी व्यवस्थापन होऊन नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत नाही.

सेंद्रीय खताची निर्मिती
सोसायटीमधील ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्यापासून सेंद्रीय खत बनविले जाते. त्यासाठी खत निर्माण करणाऱ्या एका कंपनीला सोसायटीच्यावतीने काम देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे सोसायटीमध्ये कचऱ्याची समस्या कधीही निर्माण होत नाही.

पर्यावरण संवर्धन
सोसायटीमधील सदस्यांनी स्वच्छता आणि पर्यावरणाचा ध्यास घेतला आहे. सदस्यांना स्वच्छ हवा मिळावी यासाठी सोसायटीच्या उद्यानात पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. सोसायटीच्या सीमा भिंतीच्या बाजूने प्रत्येकी दहा फुटांवर एका वृक्षाची लागवड करण्यात आलेली आहे.

सुरक्षा व्यवस्था...
सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. सोसायटीच्या संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ते २४ तास कार्यरत असतात. त्याचबरोबर इमारतीला आगीपासून धोका संभवू नये यासाठी सुसज्ज अशी अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे आगीचा धोका संभवत नाही.

वीज बचतीसाठी सौर उर्जा
सोसायटीमध्ये विजेचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी सोसायटीतील सदस्यांना अंघोळ करण्यासाठी गरम पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रकल्प उभारला आहे. प्रत्येक सदनिकाधारकांना त्याचा लाभ घेता येतो.
स्वयंपाकासाठी सुसज्ज गॅस वाहिनीची यंत्रणा आहे. सर्व सभासदांना बंदिस्त वाहिनीद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरविला जातो. त्यामुळे गॅस बुकिंग करणे किंवा गॅस आणणे यासाठी लागणारा वेळ, पैशांची बचत होते.

मुलांसाठी भव्य उद्यान
मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास व्हावा यासाठी सोसायटीच्या परिसरामध्ये सर्व सुविधांयुक्त असे उद्यान उभारण्यात आले आहे. त्यामध्ये मुलांना सर्व प्रकारचे खेळ खेळता येतील आणि व्यायाम करता येईल यावर विशेष भर देण्यात आला आहे.

व्यायामशाळा, जॉगिंग पार्क
नागरिकांना आपल्या धावपळीच्या जीवनात शरीराकडे लक्ष देता यावे यासाठी सोसायटीच्या बाजूने असलेल्या उद्यानात जॉगिंग पार्क उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर सदस्यांसाठी व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. सोसायटीमधील बहुतांशी सदस्य त्याचा लाभ घेतात.


सभासद जपत असलेला एकोप्यामुळे सर्वांमध्ये जीवाभावाचे संबंध निर्माण झाले आहेत. कामगार, व्यावसायिक असे सर्व सदस्य सोसायटीमध्ये राहतात. आम्ही सर्वजण एकत्रित निर्णय घेऊन कामे करतो. एक आदर्श सोसायटी म्हणून अल्पावधीतच आमची सोसायटी नावारुपाला आली आहे.
- जयंत वाणी, अध्यक्ष, ऐश्वर्यम कोर्टयार्ड

सोसायटीमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक राहतात. सर्व सदस्य सर्व उपक्रमांत सहभागी होतात. प्रत्येकाने सुचवलेली उपाययोजना अमलात आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सर्व सदस्यांमध्ये समाधानाची भावना आहे. सफाई तसेच इतर कामांसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित काम करून घेतले जाते.
- पंढरीनाथ रेणुसे, सचिव

PNE25U82043, PNE25U82086, PNE25U82089

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com