मुलाचा खून करून दांपत्याचा आत्महत्येचा प्रयत्न  
आईचा मृत्यू तर वडील बचावले, खासगी सावकाराच्या त्रासाने उचलले पाऊल

मुलाचा खून करून दांपत्याचा आत्महत्येचा प्रयत्न आईचा मृत्यू तर वडील बचावले, खासगी सावकाराच्या त्रासाने उचलले पाऊल

Published on

पिंपरी, ता. १८ : खासगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून वडिलांनी आपल्या दहा वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केला व त्यानंतर या दांपत्याने गळफास लावून घेतला. त्यात आईचा मृत्यू झाला तर वडील बचावले. ही धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील चिखलीतील सोनवणे वस्ती येथे घडली.
यात धनराज वैभव हांडे (वय १०), त्याची आई शीतल वैभव हांडे (वय ४१) यांचा मृत्यू झाला असून, धनराजचे वडील वैभव मधुकर हांडे (वय ५०, सर्व रा. सोनवणे वस्ती, चिखली, मूळ-डिंगोरी, ता. जुन्नर) हा या घटनेत बचावला.
सावकाराने व्याजाच्या पैशासाठी तगादा लावल्याने हे पाऊल उचलल्याची फिर्याद वैभवने दिल्यानंतर पोलिसांनी सावकारी अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून संतोष पांडुरंग कदम (वय ४८, रा. जीवननगर, ताथवडे), संतोष दत्तात्रेय पवार (वय ४९, रा. पवार वस्ती, कुदळवाडी, चिखली), जावेद मेहबूब शेख (वय ३६, रा. पाटीलनगर रोड, मोई, ता. खेड) यांना अटक केली तर एका महिलेवर गुन्हा दाखल आहे.
वैभव हांडे याने आरोपी संतोष कदम याच्याकडून व्यवसायासाठी सहा लाख रुपये व संतोष पवार याच्याकडून दोन लाख रुपये दरमहा १० टक्के व्याजाने तसेच जावेद याच्याकडून चार लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात वैभवने कदम यास मुद्दलाची परतफेड करून, साडे नऊ लाख व्याज देऊन, त्यांच्या नावे असलेली एक एकर जमीन लिहून दिली होती तर आरोपी संतोष पवार यास दरमहा वीस हजार व्याजाची रक्कम व वीस गुंठे जागा लिहून दिली होती. तरीही संतोष पवारने फिर्यादीस १४ लाख रुपये दिल्याशिवाय जमीन परत देणार नसल्याचा तगादा लावला होता. आरोपी जावेद यास घेतलेल्या रकमेच्या बदल्यात साडे चार लाख रुपये व्याज दिले होते. तरीही आरोपींनी वैभव यास व्याजाचे पैसे देण्यासाठी वेळोवेळी त्रास दिला. त्याला कंटाळून हांडे कुटुंबाने हे पाऊल उचलले.
हांडे कुटुंबीय चौदा वर्षांपासून चिखली येथे राहण्यास असून, त्यांचे मेडिकल आहे. दोन दिवसांपूर्वीच मोठ्या मुलाला त्याच्या मावशीकडे मुंबईला पाठवले होते. शुक्रवारी (ता. १७) वैभव, त्याची पत्नी शीतल व छोटा मुलगा धनराज घरी होते. दरम्यान, वैभवने मुलगा धनराज याचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
-----------------
असा झाला प्रकार उघडकीस...
चिखली पोलिस ठाण्याच्या फोनवर शुक्रवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास अमित गाढवे यांचा फोन आला. त्यांची बहीण शीतल हांडे यांनी त्यांच्या मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली असून, ती फोन उचलत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी घरी जाऊन पहिले असता, हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, वैभव याचा श्वासोच्छ्वास सुरु असल्याने त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत तर शीतल व धनराज यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
----------------

पंधरा दिवसात दुसरी घटना
खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून जीवन संपविल्याची पंधरा दिवसातील शहरातील ही दुसरी घटना आहे. चिंचवड स्टेशन येथील राजू नारायण राजभर (वय ४५) या रिक्षाचालकाने ३ जानेवारीला राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com