संगणक प्रयोगशाळा योजनाच ‘हँग’
आशा साळवी
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ८ ः विद्यार्थ्यांना संगणकाची माहिती देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन समग्र शिक्षा अभियान राबवीत आहे. यानुसार शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा सुरू होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात गेल्या १४ वर्षांत महापालिकेच्या १३४ पैकी केवळ चारच शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा सुरू झाली आहे.
इतर शाळांना संगणकच मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान कसे मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकूणच संगणक प्रयोगशाळा निर्मितीची योजनाच ‘हँग’ केल्यासारखी स्थिती आहे. खासगी शाळांप्रमाणेच महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. संगणकाचे ज्ञान ही काळाची गरज असल्याने शाळेत संगणक प्रयोगशाळा असणे आवश्यक आहे.
त्यानुसार २०११-१२ या शैक्षणिक वर्षात या योजनेची अंमलबजावणी शहरात सुरू झाली. यास दीड दशक लोटत असताना चार शाळांपुरतीच योजना मर्यादित राहिली आहे.
संगणक प्रयोगशाळा शिक्षण संचालक (पुणे) यांच्या कार्यालयातर्फे संगणक प्रयोगशाळा सुरू केल्या जातात. प्रत्यक्षात यानंतरच्या शैक्षणिक वर्षांत शहरातील एकाही शाळेत संगणक प्रयोगशाळा सुरू झाली नाही. त्यामुळे १३० शाळांमधील विद्यार्थी इतकी वर्षे संगणकाच्या ज्ञानापासून वंचित राहिले आहेत.
शाळांना १० संगणक
शाळेतील संगणक विभागात माहिती तंत्रज्ञान हा विषय सकाळ विभागात ५ वी ते ७ वी ला तसेच दुपार विभागात ८ वी ते १० वी ला अभ्यासक्रमानुसार शिकवला जातो. शिक्षण संचालक कार्यालयातर्फे चार शाळांमध्ये प्रत्येकी पाच संगणक संच देण्यात आले आहेत. या शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या संगणक प्रयोगशाळेत वीजपुरवठा आणि इतर सोयीसुविधा असणेही आवश्यक आहे. प्रशालेचा सुसज्ज अशा संगणक कक्ष असणे आवश्यक आहे. त्यांना शिक्षक दिले जातात. शासनाने दिलेल्या संगणक कक्षात १० संगणक आहेत. संगणक प्रात्यक्षिक देणे सोपे जावे म्हणून प्रोजेक्टरची सुद्धा व्यवस्था अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे.
संगणक अभ्यासक्रम
संगणक अभ्यासक्रमात पेंटब्रश, वर्डपॅड, एमएस वर्ड, पॉवरपॉइंट, एक्सेल, बेसिक लँग्वेज, सी प्रोग्रॅमिंग, इंटरनेट याचा समावेश आहे. मुंबईतील स्किल ट्री कन्सल्टिंग कंपनीकडून प्रयोगशाळेत एका शिक्षकाची नेमणूक केली जाते. प्रयोगशाळेत १० संगणक, ११ हेडफोन, प्रत्येकी एक प्रोजेक्टर, युपीएस, डिजिटल बोर्ड असणे आवश्यक आहे. संगणक शिक्षकाने नेमून दिलेल्या शाळेतील सहावी ते बारावीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना संगणकाचे प्रशिक्षण नियमितपणे देणे अपेक्षित आहे. इतक्या चांगल्या योजनेची अंमलबजावणी मात्र अजिबात समाधानकारक नाही.
---
विद्यार्थ्यांची संगणक प्रयोगशाळेच्या माध्यमातून उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आधुनिक काळात संगणकाशी मैत्री करावी लागेल व ते हाताळण्याचे शिक्षणही घ्यावे लागेल हे उद्दिष्ट समोर ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेद्वारे कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत चार शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.