सात कलमी उपायांचा दिलासादायक ‘अमल’

सात कलमी उपायांचा दिलासादायक ‘अमल’
Published on

मंगेश पांडे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २३ : एकेरी वाहतूक करणे, चौकात वाहतूक बेट उभारणे, रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविणे, दिशादर्शक फलक उभारणे, सिग्नल यंत्रणा उभारणे यासह इतरही उपाययोजना राबविल्याने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सुमारे सोळा चौकांतील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत झाली आहे. यामुळे वाहतूक सुरळीत झाली असून, वाहन चालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कृती आराखड्याअंतर्गत राबविलेल्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा अभ्यास करून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. वाहतूक कोंडी मुक्त चौक करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले. त्यानुसार वाहतूक पोलिस व महापालिका यांनी समन्वय साधून वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकात उपाययोजना राबविल्या. यामुळे वाहतूक कोंडी फुटण्यास मदत झाली आहे. तसेच संबंधित मार्गावरून जाताना, प्रवास करताना पूर्वीपेक्षा आता सरासरी चार मिनिटांचा कमी वेळ लागत आहे.

महाळुंगे येथील एचपी चौकात एकेरी वाहतूक केली आहे. तसेच त्रिवेणीनगर चौकाचे रुंदीकरण करून वाहतूक बेट उभारले आहेत. अशाचप्रकारे इतर ठिकाणीही सिग्नल यंत्रणा उभारणे, रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविणे, दिशादर्शक फलक उभारणे यांसह इतरही उपाययोजना राबविल्या आहेत.

वेळीची बचत
रस्ता ः पूर्वीचा वेळ ः आताचा वेळ
- भोसरी ते मोशी ः १५ ः ११
- भक्ती-शक्ती चौक ते तळवडे चौक ः १३ ः ९
- निगडी लोकमान्य टिळक चौक ते तळवडे चौक ः १७ ः १२
- आकुर्डी खंडोबा मंदिर चौक ते चिखली ः १६ ः १२
- भक्ती-शक्ती चौक ते स्पाईन सिटी मॉल ः ९ ः ५
- महाळुंगे एचपी चौक ते महाळुंगे इंगळे ः २६ ः १४

उपाययोजना राबविलेले चौक
आकुर्डीतील खंडोबा मंदिर वाय जंक्शन, मोशीतील गोडाउन चौक, चिखलीतील घरकुल चौक, त्रिवेणीनगर चौक, ताथवडे अंडरपास चौक, कृष्णानगर चौक, चाकण चौक, आंबेठाण चौक, सूस पाषाण पूल ते सनीज वर्ल्ड रस्ता, एचपी चौक, महाळुंगे इंगळे चौक, रावेत पंपिंग स्टेशन, पुनावळे चौक, शिवार चौक, स्वराज गार्डन चौक.

‘‘शंभर दिवस कृती आराखड्याअंतर्गत राबविलेल्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा अभ्यास करून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या मदतीने विविध कामे करण्यात आली. यामुळे वाहतूक कोंडी फुटण्यास मदत झाली आहे.
- बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

‘‘शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, वाहन चालकांना कमी वेळेत सुलभ प्रवास करता यावा, यासाठी महापालिका वाहतूक पोलिसांसह समन्वय साधून विविध उपाययोजना राबवीत आहे. त्या अनुषंगाने विविध ठिकाणी दुभाजक, सिग्नल उभारणे तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होत आहे.
- बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता, महापालिका

‘‘महाळुंगे येथील एचपी चौकात पूर्वी खूप वाहतूक कोंडी असायची. या कोंडीत अडकून पडावे लागायचे. मात्र, आता एकेरी वाहतूक केल्याने वाहतूक सुरळीत राहते. वेळ वाया जात नाही.
- रवींद्र खेडकर, वाहनचालक
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com