खुनाच्या गुन्ह्यासाठी आग्रह धरणार

खुनाच्या गुन्ह्यासाठी आग्रह धरणार
Published on

पिंपरी, ता. २४ ः ‘‘वैष्णवीच्या अंगावर जबर मारहाणीच्या जखमा आहेत. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय आहे. योग्य तपासान्वये मी वैष्णवीचा अमानुषपणे छळ करणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांशी बोललो आहे. हे प्रकरण त्यांनी गांभीर्याने घेतले आहे,’’ अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी (ता. २४) पत्रकारांशी बोलताना दिली.
वैष्णवीचा छळ आणि मृत्यू प्रकरणाची दखल घेऊन केंद्रीय मंत्री आठवले यांनी शनिवारी वाकड येथील तिच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, ‘‘अलीकडच्या काळात राज्य आणि देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. महिला आयोगाने अशा घटनांमध्ये निष्काळजीपणा करता कामा नये. वैष्णवी हगवणे प्रकरणातील नीलेश चव्हाण असो अथवा संबंधित कोणीही, कुठल्याही पक्षाचा असो कोणालाही सोडले जाणार नाही.’’

पाच दिवस आरोपी बाहेर कसे ? : डॉ. गोऱ्हे
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देखील वैष्णवीच्या वाकड येथे कुटुंबीयांना भेट देऊन त्यांना मानसिक आधार दिला. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘पाच दिवस आरोपी बाहेर कसे राहू शकले, यावर प्रश्नचिन्ह आहे आणि या प्रकरणात ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदत केली. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. मयुरी हगवणे या वैष्णवीच्या जावेची भेट घेऊन तिला देखील न्याय मिळवून देणार आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबत संबंधित संरक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

आरोपींना कडक शासन होईपर्यंत प्रयत्न : पंकजा मुंडे
पशुसंवर्धन व पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी देखील वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मुंडे म्हणाल्या, ‘‘वैष्णवीसोबत घडलेला प्रकार अतिशय दुदैवी आहे. आरोपींना न्यायाच्या कक्षेत बसणारी कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करणार आहे.’’

मनसेही कस्पटे कुटुंबीयांसोबत
मनसेच्या प्रदेश सरचिटणीस रिटा गुप्ता यांनीही वैष्णवीच्या कुटुंबीयांची वाकड येथे भेट घेतली. गुप्ता यांच्या मोबाईलवरुन शर्मिला ठाकरे यांनी वैष्णवीच्या आईशी संवाद साधून त्यांना धीर दिला. घडलेला प्रकार अतिशय वाईट आहे. वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी मनसे आपल्यासोबत आहे, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.


‘‘या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींना तत्काळ अटक न केल्याने कुणा उच्चपदस्थ व्यक्तींचा हस्तक्षेप असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस महिलांना भरोसा सेलमध्ये बोलावतात. परंतु महिला दक्षता समित्यांमध्ये त्यांच्या तक्रारींना वेळेत उत्तर मिळत नाही. तक्रारी वेळेवर ऐकल्या गेल्या असत्या; तर अनेक घटनांपासून बचाव होऊ शकला असता.’’
- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com