

पिंपरी, ता. २५ : पिंपरी चिंचवड शहर-उपनगरांत रविवारी (ता.२५) दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. यामुळे सुटीचे औचित्य साधून खरेदी आणि फिरायला निघालेल्या नागरिकांची गैरसोय झाली. तर, सतत पाऊस होत असल्याने अनेक सखल भागांत पाणी साचल्याचे दिसून येत आहे.
शहर-उपनगरांत शनिवारी (ता.२५) रात्रीच्या सुमारास काही वेळ विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पहाटेपासूनच हजेरी लावली. सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी दुपारनंतर तो पुन्हा वाढला. सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच राहिली. यामुळे बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवरील वर्दळ कमी दिसून आली. पावसामुळे अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. जे नागरिक खरेदीसाठी किंवा फिरायला घराबाहेर पडले, त्यांना पावसामुळे छत्र्या-रेनकोटचा आधार घ्यावा लागला. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढणे कठीण झाले होते. त्यामुळे शहरातील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.
दरम्यान, आगामी दोन ते तीन दिवस शहरातील वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. या काळात हलक्या मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
तापमानात मोठी घट
पावसामुळे शहरातील तापमानात मोठी घट झालेली दिसून आली. मेच्या सुरुवातीला चाळिशीपार गेलेले शहरातील तापमान गेल्या आठवड्यात जवळपास दहा अंश सेल्सिअसने घसरले. रविवारीही चिंचवड येथे कमाल तापमान २७.१, तर किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.