पोलिसांकडून चव्हाणची ‘लुक आउट’ नोटीस

पोलिसांकडून चव्हाणची ‘लुक आउट’ नोटीस
Published on

पिंपरी, ता. २५ : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरारी आरोपी नीलेश रामचंद्र चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर, पुणे) याच्याविरोधात बावधन पोलिसांनी ‘लुक आउट’ नोटीस जारी केली आहे. तसेच रविवारी (ता. २५) त्याच्या भावासह त्याच्या संपर्कातील व्यक्तींकडे कसून चौकशी केली.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शनिवारी (ता. २४) कलम वाढ करून नीलेश चव्हाण यालाही सहआरोपी केले आहे. वैष्णवी यांच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे. वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दहा महिन्यांचे बाळ चव्हाणकडे होते. कस्पटे कुटुंबीय बाळ आणण्यासाठी गेले असता, नीलेशने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना धमकाविले. या प्रकरणीही वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हे गुन्हे दाखल झाल्यापासून चव्हाण फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पुणे पोलिसांसह पिंपरी चिंचवड पोलिसांची पथकेही त्याच्या मागावर आहेत. दरम्यान, चव्हाण हा हवाई मार्गे परदेशात पळून जाऊ नये, यासाठी बावधन पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक आउट नोटीस बजावली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली.

आणखी एक मोटार जप्त
वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे सात दिवस फरार होते. या कालावधीत त्यांनी थार, इंडेव्हर व बेलेनो या आलिशान मोटारींनी ठिकठिकाणी प्रवास केला. त्यातील थार व इंडेव्हर या मोटारी पोलिसांनी अगोदरच जप्त केल्या आहेत. तर बेलेनो ही मोटार रविवारी जप्त केली.


लुक आऊट नोटीस म्हणजे काय?
लुक आऊट नोटीस ही तपास यंत्रणेकडून जारी केली जाते. यामध्ये विमानतळावरून एखाद्या गुन्ह्यातील आरोपी देश सोडून पळून जाऊ नये, यासाठी सतर्क राहण्याचे आदेश दिले जातात. संबंधित आरोपीचे छायाचित्र व वर्णन विमानतळ प्रशासनाला देवून संबंधित व्यक्ती आढळल्यास त्याच्यावर तत्काळ कारवाई करून ताब्यात घ्यावे, याबाबत ही नोटीस जारी केली जाते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com