शहरात १५ हजार नवीन वाहन चालक!
अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, २६ ः पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात मागील तीन महिन्यांत ५८ हजार १६७ जणांनी वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन) घेतले आहेत. यात १५ हजार ५२४ वाहनचालकांनी पहिल्यांदाच वाहन परवाना घेतला आहे. मागील वर्षी याच कालावधीत १३ हजार ३९५ जणांनी नवीन परवाने काढले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत नवीन वाहन परवाने काढणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
शाळा आणि महाविद्यालयाच्या परीक्षा मार्च आणि एप्रिल महिन्यात संपतात. पालकही महाविद्यालयाला सुट्टी लागल्यानंतर वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुलांना मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये पाठवितात. तीस दिवसांचे प्रशिक्षण झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १८ वर्षांवरील मुलांना वाहन परवाने दिले जाते. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्याच्या सुट्टीच्या कालावधीत नवीन वाहन परवाने काढणाऱ्यांची संख्या वाढते.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात १ मार्च ते २५ मे या कालावधीत एकूण ७५ हजार ८१३ जणांनी शिकाऊ परवाना आणि वाहन परवान्यासाठी अर्ज केला होता. यात शिकाऊ परवान्यासाठी ३५ हजार ३१२ जणांनी आणि पक्क्या परवान्यासाठी ४० हजार २२८ जणांनी अर्ज केला. तर एकूण ५८ हजार १६७ जणांनी वाहन चाचणी परवाना दिली. गेल्या वर्षी याच कालावधीत ६५ हजार २७६ जणांनी वाहन परवान्यासाठी अर्ज केले होते. तर ५१ हजार ६२६ जणांनी वाहन परवाना चाचणी दिली होती. मागील वर्षीच्या तुलनेत परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांची आणि चाचणी देणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
ऑनलाइन करा अर्ज
प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित प्रत्येक कामासाठी पूर्वी नागरिकांना चकरा माराव्या लागायच्या, पण शासनाने कार्यालयाशी संबंधित अनेक बाबी ऑनलाइन केल्या आहेत. घरबसल्या त्यांचे काम करता येते. यात शिकाऊ परवाना, वाहन चालक परवाना नूतनीकरण, दुबार वाहन परवाना, परवान्यावर पत्ता बदलणे यासह इतर अनेक सुविधा ऑनलाइन दिल्या जात आहेत. नागरिकांना आरटीओच्या https://sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येतो.
------
शिकाऊ परवान्याचा कालावधी किती?
आरटीओकडून कायमस्वरूपी परवाना देण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला शिकाऊ परवाना दिला जातो. त्याची वैधता सहा महिने आहे. चालकाला त्याचे वाहन चालविण्याचे कौशल्य सुधारण्यासाठी हा वेळ दिला जात असल्याची माहिती आरटीओने दिली.
---------
मोटार वाहन कायद्याने अल्पवयीन मुलांना ५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेचे वाहन किंवा वीस वर्षांखालील व्यक्तीस व्यावसायिक वाहन चालविण्यास मान्यता नाही, तरीही पालक मुलांच्या हट्टापायी वाहन चालविण्यास देतात. पालकांनी मुलांना मुलांचा परवाना काढूनच त्यांना वाहन दिले पाहिजे. यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत नवीन परवाना काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
परवाना ः वर्ष
संख्या ः २०२४ ः २०२५
शिकाऊ परवाना अर्ज ः ३०,५३५ ः ३५,३१२
पक्का परवाना अर्ज ः ३४,६१० ः ४०,२२८
एकूण अर्ज ः ६५,२७६ ः ७५,८१३
------
शिकाऊ परवाना चाचणी ः १९,३१३ ः २३,२०९
पक्का परवाना चाचणी ः ३२,३१३ ः ३४,९५८
एकूण चाचणी ः ५१,६२६ ः ५८,१६७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

