पिंपरी जमीन वापर

पिंपरी जमीन वापर

Published on

उद्योगनगरीचा ४१ टक्के भाग अविकसित

आकुर्डी-निगडी प्राधिकरणचाच नियोजनबद्ध विकास; केवळ २८ टक्के क्षेत्र निवासी

पिंपरी, ता. २७ ः वन विभाग; मुळा, पवना व इंद्रायणी नद्या; पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्र वगळून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे क्षेत्र १७ हजार ३१२ हेक्टर अर्थात १७३.१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील केवळ ५९ टक्के भाग विकसित आणि ४१ टक्के भाग अविकसित आहे. शहराच्या भूभागापैकी निवासी क्षेत्र २८ टक्के आहे. त्यातील नियोजनबद्ध विकास केवळ आकुर्डी-निगडी प्राधिकरण, स्मार्ट सिटीमुळे पिंपळे सौदागर व आयटी हबमुळे काही प्रमाणात वाकड या परिसरांचाच नियोजनबद्ध विकास झाला आहे. बहुतांश भागात गावठाणे, झोपडपट्ट्या आणि नागरिकांनी आपापल्या सोईनुसार निवासासाठी बांधलेली घरे आहेत. त्यामुळे थोड्या भागात शहरीकरण, नागरीकरण तर काही भागात बकालपणा, अविकसितपणा दिसत आहे. शहराच्या सर्वांगिण विकासासाठी विकास आराखडा (डीपी) उपयुक्त ठरणार आहे.
शहरातून मुळा, पवना, इंद्रायणी नद्या वाहतात. त्यांची पूररेषा व त्यांना मिळणारे नाले, ओढे यांच्या परिसरात बांधकामे करता येत नाही. शिवाय, वनविभागाची जागा पुनावळे, मोशी, चऱ्होली भागात आहे. बोऱ्हाडवाडीत हरितपट्टा आहे. भोसरी, दिघी, तळवडे, चिखली, निगडी, रावेत, किवळे भागात संरक्षण विभागाच्या आस्थापनांमुळे रेडझोन आहे. मोशीत कचरा डेपोमुळे बफरझोन आहे. शिवाय, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनडीटीए) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण झाल्यानंतर निवासी भाग महापालिकेकडे आणि मोकळी जमीन पीएमआरडीएकडे ठेवली आहे. या क्षेत्रासह भोसरी, पिंपरी, चिंचवडच्या क्षेत्रात औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) आहे. हे सर्व क्षेत्र वगळून शहराच्या १८१ चौरस किलोमीटरपैकी १७३.१२ चौरस किलोमीटर भू क्षेत्र महापालिकेकडे आहे. त्यातील ५९ टक्के भूभाग विकसित आणि ४१ भूभाग अविकसित आहे. मात्र, विकसित भागाचाही नियोजनबद्धपणे विकसित झालेला नाही. त्यासह अविकसित भाग नियोजन करून विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘डीपी’ महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी आपली मते व्यक्त करण्याची आवश्यकता असून, हरकती व सूचना मांडण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे.

असे आहे वर्गीकरण
शहरात फक्त निवासस्थानांचे प्रमाण ८४ टक्के आहे. यामध्ये बैठी घरे, सदनिका, चाळीतील घरांचा समावेश आहे. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी, सांगवी, दापोडी, वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, पिंपळे सौदागर अशा १८ गावांचे मूळरूप अर्थात गावठाणांचे क्षेत्र सहा टक्के आहे. निवासासह वेगवेगळ्या लहान व्यावसायिकांची दुकाने असे मिश्र वापराचे क्षेत्र आठ टक्के आणि घोषित व अघोषित झोपडपट्ट्यांचे क्षेत्र दोन टक्के आहे. बहुतेक निवासी विकास क्षेत्र प्राधिकरणाकडून महापालिकेकडे वर्ग झालेले आहे. तसेच, पिंपळे सौदागर, वाकड या भागाचा विकसित भागात समावेश होतो.

महामार्गालगत विकास
शहराच्या एकूण विकासापैकी व्यावसायिक विकासाचा वाटा चार टक्के आहे. बहुतांश व्यावसायिक विकास मुख्य रस्त्यांलगत झाला आहे. यामध्ये मुंबई-बंगळूर महामार्ग, मुंबई-पुणे महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, औंध-रावेत रस्ता आदी रस्त्यांचा समावेश आहे.

क्षेत्रानुसार जमिनीचा वापर (टक्क्यांमध्ये)
निवासी / २८
व्यावसायिक / ४
औद्योगिक / ११
सार्वजनिक / २.५
उद्यान, मैदाने / २
सार्वजनिक वापर / १.२
वाहतूक / १०
संरक्षण विभाग / ०.०५
शेती / १७
पाणथळ / २
मोकळी जमीन / २१

वनजमीन- डोंगराळ / १

विकसित जमिनीचा वापर (टक्क्यांमध्ये)
निवासी / ४८
व्यावसायिक / ६.६
औद्योगिक / १९
वाहतूक / १६.४
सार्वजनिक / ४.२
मनोरंजन / ३.७
सार्वजनिक वापर / २

निवासस्थाने प्रमाण (टक्क्यांमध्ये)
फक्त निवास / ८४
गावठाणे / ६
मिश्र (घरे व दुकाने) / ८
झोपडपट्टी / २
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com