बंधारा पूल मुदतीआधी पूर्ण, रस्त्याचे काम अपूर्ण

बंधारा पूल मुदतीआधी पूर्ण, रस्त्याचे काम अपूर्ण

Published on

सोमाटणे, ता. २७ : गहुंजे येथील बंधारा पुलाचे काम मुदतीआधी पूर्ण होऊनही अर्धा किलोमीटर रस्त्याचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची दळवळणाची समस्या कायम आहे.

गेल्या पन्नास वर्षांच्या साळुंब्रे, गहुंजे ग्रामस्थांच्या प्रदीर्घ मागणीनंतर गहुंजे-साळुंब्रे ही गावे जोडणाऱ्या कोल्हापूर पद्धतीचा बंधारा-पुलाच्या कामाला मंजुरी मिळून पुलाचे काम हाती घेण्यात आले होते. शेतीच्या पाण्यासाठी बंधारा व त्यावरुन दळवळणासाठी दुपदरी रस्ता असे दुहेरी उपयोगाचे नियोजन करुन कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभागाच्या देखरेखीखाली या कामाला सुरुवात झाली होती. या कामासाठी आवश्यक असलेला एक हजार ९७ कोटी १६ लाख रुपयांचा निधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उपलब्ध केला होता. पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कामाकडे सातत्याने लक्ष दिल्याने ठेकेदारांनी बंधारा-पुलाचे काम मुदतीआधीच पूर्ण केले. यामुळे साळुंब्रे परिसरातील शेतीच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सुटला. बंधाऱ्यावर बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक दुपदरी रस्त्यामुळे गहुंजे-साळुंब्रे ग्रामस्थांचा दळणवळणाचा कायमचा प्रश्न सुटला, असे वाटत असतानाच पुलाच्या पुढील दक्षिण बाजूकडे मूळ रस्त्याला जोडणाऱ्या अर्धा किलोमीटरच्या रस्त्याचे काम हे ‘पीएमआरडीए’ने वेळेत पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु पावसाळा सुरू होण्यास तीन आठवडे अवकाश असल्याचे गृहित धरुन प्रशासनाने रस्त्याचे काम धिम्या गतीने हाती घेतले होते. त्यातच पावसाने दरवर्षीच्या तुलनेत दोन आठवडे आधीच हजेरी लावल्याने रस्त्याचे काम आणखी रखडले. याचा फटका गहुंजे-साळुंब्रे गावांना बसला आहे. साळुंब्रे येथील नागरिकांना देहू
रोड, पुणे-पिंपरी-चिंचवड येथे जाण्यासाठी वळसा घालावा लागत आहे. पावसाचे पाणी साळुंब्रे साकवावरून वाहत असल्याने हा रस्ता बंद आहे. सध्या येथील नागरिकांना सोमाटणे मार्गे दहा ते बारा किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. यात त्यांना इंधन व वेळेचा अपव्यय सहन करावा लागत आहे. अर्धा किलोमीटरच्या या रस्त्याचे लवकर खडी, डांबरीकरण तातडीने
करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

गहुंजे-साळुंब्रे पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असताना आम्ही मोठे प्रयत्न करुन चांगल्या दर्जाचे व वेळेत पुलाचे काम केले. या पुलामुळे शेतीच्या पाण्याचा व दळवळणाचा कायमचा प्रश्न सुटणार आहे.
- समीर मोरे, अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

PNE25V17795

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com