सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरीला; एकावर गुन्हा
पिंपरी : घरात शिरलेल्या चोरट्याने घरातील दोन लाख २० हजारांचे दागिने आणि १२ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना रुपीनगर, तळवडे येथे घडली. याप्रकरणी ज्योती राजीव खैरे (रा. तळवडे) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नथुलाल सोळंखी (रा. त्रिवेणीनगर टॉवर लाइन, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ज्योती खैरे यांच्या घरातून नथुलाल याने दोन लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १२ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.
ब्रँड स्टिकरचा वापर करून बेकरी उत्पादन विक्री; एकावर गुन्हा
पिंपरी : बेकरी उत्पादने विकण्यासाठी दुसऱ्याच्या ब्रँड स्टिकरचा वापर करून बेकरी उत्पादने विक्री केली. याप्रकरणी एका बेकरी दुकानदारावर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई त्रिवेणीनगर येथील बेस्ट बेकरी येथे करण्यात आली. याप्रकरणी साजीद असगरअली अन्सारी (रा. भोसरी) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोहम्मद ताजीम मोहम्मद यामीन शेख (वय ३६, रा. त्रिवेणीनगर, तळवडे, मूळ - उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद शेख याचे त्रिवेणीनगर येथे बेस्ट बेकरी नावाने दुकान आहे. शेख याने त्याच्या बेकरीत फिर्यादी यांच्या क्लायंट पूनम बेकरीच्या ब्रँड स्टिकरचा वापर केला. ब्रँड स्टिकर बेकरी उत्पादनांवर चिकटवून त्यांची विक्री केली. या कारवाईत ११ हजार ५०० रुपये किमतीचे स्टिकर आढळले.
दारू वाहतूकप्रकरणी दोघांना अटक
पिंपरी : विक्री करण्यासाठी दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई वाकड येथे करण्यात आली. गणेश तुकाराम कांबळे (वय २५), बाळू दत्तू भोगिले (वय ३३, दोघेही रा. गणेशनगर, थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड-भोसरी बीआरटी रस्त्यावरून बेकायदारित्या टेम्पोतून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्यामध्ये दोन लाख ३१ हजार २६३ रुपये किमतीची विदेशी दारू आढळली. पोलिसांनी दारू आणि टेम्पो असा एकूण १० लाख ३१ हजार २६३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हे पिंपळे निलख येथील अरविंद वाइन्स येथून डांगे चौकातील राहुल बार या दुकानात विक्रीसाठी दारूची वाहतूक करीत होते. दारूची वाहतूक करण्याबाबत त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

