एटीएम फोडणाऱ्या टोळीतील दोघांना अटक

एटीएम फोडणाऱ्या टोळीतील दोघांना अटक

Published on

पिंपरी, ता. २७ : गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशिन फोडून दरोडा टाकणाऱ्या हरियाना राज्यातील टोळीतील दोन आरोपींना देहूरोड पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रंगेहाथ पकडले. घटनास्थळावरून मोटारीतून पसार झालेल्या त्यांच्या टोळीतील तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. २७) पहाटे दोनच्‍या सुमारास देहूगाव येथील इंडसइंड बँकेच्या एटीएममध्ये घडला.
मुस्तफा मोबीन खान (वय ३०) आणि मुस्तकीम मोबीन खान (वय २५, दोघेही रा. पिनागव्वान, ता. पुन्हाना, जि. नुह, हरियाना) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तसेच सीमा युसूफ खान (वय ४०), वारीस खान (वय २०) आझाद खान (वय ४५), युसूफ खान (सर्व रा. हरियाना) यांच्‍यावर गुन्‍हा दाखल झाला आहे. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास देहू-आळंदी रस्त्यावरील इंडसइंड बँकेच्या एटीएमजवळ एक सफेद रंगाची मोटार संशयास्पद थांबली असल्याचे दोन स्थानिक नागरिकांना दिसले. त्यांनी एटीएम केंद्राजवळ जाऊन पहिले असता काहीतरी गडबड सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना कल्पना दिली. काही वेळातच पोलिस आल्‍याचे पाहताच मोटार भरधाव वेगात निघाली. पोलिस एटीएम केंद्राकडे गेले असता, एटीएमचे शटर उचकटलेले दिसले व आतून आवाज येत असल्याने त्यांनी शटर उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी दोन आरोपी गॅस कटरने एटीएम मशिन तोडण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, दोन स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपींनी शिवीगाळ, दगडफेक केली. त्याचवेळी तेथे पोलिसांची अधिक कुमक दाखल झाली. दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून हरियानातील अन्य साथीदारांची माहिती समोर आली असून, हे टोळी स्वरूपात गुन्हे करीत असल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जोएब शेख करीत आहेत.

युसूफ खान टोळीचा म्होरक्या
ही टोळी हरियाना राज्यातील असून, युसूफ खान हा या टोळीचा म्होरक्या असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावरही गुन्हा दाखल केला असून त्याचाही शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com