सकाळ एक्स्पो

सकाळ एक्स्पो
Published on

पिंपरी, ता.३१ ः ‘‘सकाळ माध्यम समूहाच्या शैक्षणिक प्रदर्शनामुळे एकाच ठिकाणी विविध शैक्षणिक संस्थांच्या उपक्रमांची आणि नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्‍यांना करिअरच्या वाटा शोधण्यास मदत होणार आहे. अशा वैविध्यपूर्ण ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’ ला पालकांनी आवर्जून भेट द्यावी,’’ असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी शनिवारी (ता.३१) केले.
चिंचवड - एम्पायर इस्टेट येथील रागा पॅलेस बॅक्वेट हॉलमध्‍ये ३१ मे आणि १ जून रोजी ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’चे आयोजन केले आहे. त्याच्या उद्‍घाटनप्रसंगी डॉ. काळकर हे बोलत होते. यावेळी ‘सकाळ’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार, पिंपरी चिंचवड विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य नरेंद्र लांडगे, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. योगेश भावसार, एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनियरिंग आळंदीचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल हत्ते, डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटीचे अधिष्ठाता पुष्पराज वारके, डॉ. संतोष पाचपुते, सहायक प्राध्यापक डॉ. के. निर्मला, प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, जय मातादी ऑटो ग्रुपचे मालक मनीष मोहिते, साई बालाजीचे प्राचार्य तुकाराम तेलंगे, लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप पॅरामेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. गणेश अंबिके उपस्थित होते.
डॉ. काळकर म्हणाले, ‘‘विद्येच्या माहेरघराच्या पश्‍चिम भागाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्थांची प्रगती होत आहे. वाढत्या शैक्षणिक संस्थांमुळे उपनगरांची महानगरे होत आहे. आपापल्या विविध विद्यापीठांमुळे नवीन तंत्रज्ञान येत आहे. नव्या शैक्षणिक वाटा दिसू लागल्‍या आहेत. सगळ्या पर्यायांचा विचार करून निवड केल्यावर ३ ते ४ वर्षे पायाभरणी होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना एकाचवेळी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्‍याची मुभा दिली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचे पॅकेज तयार करुन भविष्याची चांगली गुंतवणूक करावी.’’

प्रदर्शनात माहितीचे स्टॉल
या प्रदर्शनात कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान, इंटिरियर डिझाईन यासह अन्य अभ्यासक्रमांच्या माहितीचे २७ स्टॉल मांडले आहेत. हे प्रदर्शन रविवारी (ता.१) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेपर्यंत सुरू राहणार आहे. पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी विविध स्टॉल्सना भेट दिली.

प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी
शहरात पावसाने उघडीप दिल्याने सकाळपासूनच पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्टॉल, मॉडेल्स, शैक्षणिक खेळ यांच्या माध्यमातून माहिती दिली गेली. या प्रदर्शनासाठी पिंपरी-चिंचवड युनिर्व्हसिटी हे मुख्य प्रायोजक आहेत. एमआयटी एसीएस एओई हे सहप्रायोजक आहेत.


‘‘सकाळ’ने आयोजित केलेला विद्या चर्चासत्र उपक्रम अत्‍यंत महत्‍वाचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत जनजागृती करणे काळाची गरज आहे. या चर्चासत्राला माझ्या शुभेच्‍छा आहेत. तसेच हे चर्चासत्र करिअरच्‍य दृष्टीने विद्यार्थ्यांच्‍या आयुष्याची विद्या ठरेल, असे या निमित्ताने वाटते.’’
- हर्षवर्धन पाटील, कुलपती, पिंपरी चिंचवड विद्यापीठ


‘‘सकाळचा उपक्रम पालक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. डी. वाय. पाटील, पीसीईटी, बालाजी कॉलेजच्या स्टॉल्सवर पुरेशी माहिती मिळाली. उपयुक्त व्याख्यांनामुळे आणखी जाणून घेता येत आहे. इतर पालकांनी देखील सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’ला भेट द्यावी.’’
- सागर साठे, पालक, चिंचवड

‘‘मी नुकताच बारावी उत्तीर्ण झालो आहे. मला बी-टेक करायचे आहे. ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’ मुळे विविध कॉलेज आणि अभ्यासक्रमांची माहिती मिळाली आहे. स्टॉल्सवर कॉलेजच्या माहिती पुस्तिकेद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. माझ्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले.’’

- अर्थव तांबिले, विद्यार्थी, लिंक रोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com