‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद

‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
Published on

पिंपरी, ता. ३१ ः पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत (आरटीओ) नोंद असलेल्या केवळ ८.४२ टक्के वाहनचालकांनीच उच्चसुरक्षा वाहन क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवली आहे. यावरून एचएसआरपीला वाहन चालकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. एचएसआरपी बसविण्यासाठी ३० जून शेवटची तारीख आहे. पण अजूनही ९१ टक्के वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे बाकी असल्यामुळे एचएसआरपीला मुदतवाढ मिळणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविण्याची सुविधा १५ डिसेंबर २०२४ पासून परिवहन विभागाने उपलब्ध करून दिली आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी रिअर मेझॉन इंडिया कंपनीची निवड केली आहे. या कंपनीने प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरासह खेड, जुन्नर, आंबेगाव आणि मावळ तालुक्यात फिटमेंट सेंटरसाठी विविध ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. या तालुक्यांमध्ये ४१ फिटमेंट सेंटर सुरू केले असून, या सेंटरवर एचएसआरपी बसविण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड आरटीओत ३० मे पर्यंत २३ लाख ८६ हजार ७२० वाहनांची नोंद आहे. यात १५ लाख ३९ हजार वाहने ही २०१९ पूर्वीची आहेत. यापैकी केवळ दोन लाख ५७ हजार ५६५ वाहनचालकांनी ३० मे पर्यंत एचएसआरपीसाठी नोंद केली आहे. तर एक लाख २९ हजार ६३७ वाहनचालकांनी वाहनांना एचएसआरपी बसविली आहे. यावरुन वाहनांपैकी केवळ ८.४२ टक्के वाहनांनीच एचएसआरपी बसविल्याचे उघड झाले आहे. परिवहन विभागाने एचएसआरपीसाठी ३० जून शेवटची तारीख दिली असल्याने आता ३० दिवसात उर्वरित १२ लाख ८१ हजार ४३५ वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे.

‘एचएसआरपी’चा गोंधळ कायम
एचएसआरपी बसवायला सुरुवात होऊन पाच महिने झाले. तरी अजूनही गोंधळ काय संपता संपेना. एचएसआरपीची घरपोच सेवा मिळत नाही, अपॉइंटमेंट घेतलेल्या असूनही अचानक फिटमेंट सेंटर बंद होत आहेत. कधी अपॉइंटमेंटच्या दिवशी फिटमेंट सेंटरवर गेल्यावर एचएसआरपीच उपलब्ध नसते. तर कधी वाहनांची मागील व पुढील क्रमांक पाटी वेगवेगळी येत आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वाहनचालकांनी ३० जून शेवटची तारीख असल्याने ऑनलाइन नोंदणी करून लवकरात लवकर एचएसआरपी बसवून घ्यावे. मुदतवाढ देण्याचा निर्णय परिवहन आयुक्त घेणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी मुदतीत एचएसआरपी बसवून घ्यावे.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड आरटीओ

दृष्टिक्षेपात पिंपरी-चिंचवड आरटीओ
२०१९ पूर्वीची वाहने ः १५,३९,०००
२०१९ नंतरची वाहने ः ८,४७,७२०
एकूण वाहन नोंदणी ः २३,८६,७२०

३० मे पर्यंत
एचएसआरपी बसविलेली वाहने ः १,२९,६३७
एचएसआरपीसाठी आँनलाईन नोंदणी ः २,५७,५६५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com