खराळवाडीत १६ दुचाकीस्वार घसरून अपघात
पिंपरी, ता. १३ ः मेट्रो प्रशासनाने पिलरच्या दुभाजकात झाडे लावण्यासाठी लाल माती टाकली. पण, काही ठिकाणी ही माती रस्त्यावर सांडली. शहरात शनिवारी (ता. १३) पाऊस पडल्याने लाल मातीचा चिखल होऊन खराळवाडी येथे १६ ते १७ दुचाकीचालक घसरुन अपघात झाले. त्यात अनेक जण जखमी झाले.
अग्निशमन विभागाच्या जवान आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाणी मारून रस्ता स्वच्छ केला. पण, मेट्रो प्रशासनाच्या कामावर वाहन चालकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. शहरात पहिल्या टप्यात ६ मार्च २०२२ रोजी मेट्रो सुरू झाली होती. त्यानंतर टप्प्याटप्याने स्वारगेट मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली. मेट्रो सुरू होऊन साडेतीन वर्ष झाली तरी मेट्रोने अद्याप दुभाजकात रोपे लावलेली नव्हती. त्यामुळे, दुभाजकात मोठ्या प्रमाणात कचरा आणि राडारोडा टाकला जात होता. मेट्रो प्रशासनाच्या कामावर नागरिकांची प्रचंड टीका झाल्यानंतर आता मेट्रो प्रशासनाला जाग आली असून दुभाजकात रोपे लावण्याचे काम सुरू केले. त्यासाठी पिंपरी ते वल्लभनगर आगारापर्यंत दुभाजकात लाल माती टाकण्यात आली. पण, माती टाकताना कोणतीही काळजी घेतली नसल्याने अनेक ठिकाणी ही माती रस्त्यावर सांडली. मुसळधार पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला. पिंपरीकडून पुण्याच्या दिशेने जाताना खराळवाडी येथील आऊट मर्जच्या जवळ १६ ते १७ दुचाकीचालकांचे घसरुन अपघात झाले. त्यात अनेक दुचाकीचालक जखमी झाले आहेत. काही वाहन चालक तर मोठ्या वाहनांखाली येता येता थोडक्यात बचावले. मेट्रो प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका वाहनचालकांना बसला. अपघातात वाहन चालकांचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मेट्रो प्रशासनाने झाडे लावण्यासाठी माती टाकली. पण, ही माती रस्त्यावर आल्यामुळे खूप जणांचे अपघात झाले. काही चालक, प्रवासी थोडक्यात बचावले. प्रशालनाला विनंती आहे की, लवकरात लवकर रस्ते स्वच्छ करावेत.
- सुमीत भावसार, दुचाकीचालक
दुभाजकामध्ये माती टाकताना काही ठिकाणी रस्त्यावर पडली होती. संबंधित ठेकेदाराला रस्त्यावरील माती स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत.
- चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, पुणे मेट्रो