पिंपरी महापालिका निवडणूक बाजार उठला
‘वर्गणी’तून साधले निवडणुकीचे ‘गणित’
महापालिकेची तयारी; गणेशोत्सवात इच्छुकांकडून पन्नास हजार ते एक लाख वर्गणी
पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ : तब्बल साडेतीन वर्षांहून अधिक प्रशासकीय कालावधीनंतर महापालिका निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. त्यामुळे माजी नगरसदस्यांसह नवीन इच्छुकांची संख्याही वाढली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबिले जात आहेत. यात विविध कार्यक्रम, उपक्रम राबवले जात आहेत. गणेशोत्सवात याची झलक बघायला मिळाली. काही सार्वजनिक गणेश मंडळे व काही सोसायट्यांतील गणेशोत्सवातील आरत्या, कार्यक्रमांना उपस्थित राहून इच्छुकांनी सढळ हाताने वर्गणी दिली. हा आकडा तब्बल पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत होता. यापूर्वी दहीहंडी उत्सवातही लाखोंचे ‘लोणी’ चाखविण्यात व दाखविण्यात आले. आता नवरात्रोत्सवात मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल? त्यांना अधिकाधिक आकर्षित कसे करता येईल? याचे नियोजन इच्छुकांकडून सुरू आहे.
महापालिकेत २०१७ मध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची मुदत १३ मार्च २०२२ मध्ये संपली आहे. कोरोना प्रतिबंधक नियम, इतर मागासवर्गीयांना आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा आणि राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी आदी कारणांमुळे महापालिका निवडणूक वेळेत होऊ शकली नाही. त्यामुळे १४ मार्च २०२२ पासून महापालिका आयुक्त हेच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करून प्रशासनाने त्यावरील हरकती व सूचनांवर सुनावणी पूर्ण केली आहे. अंतिम प्रभाग रचना ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल. मतदार याद्या अद्ययावत करण्याचे कामही सुरू आहे. ही सर्व पार्श्वभूमी आणि दिवाळीनंतर निवडणूक होईल, अशा विश्वासाने इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या फुटीमुळे राजकीय पक्षांची संख्या वाढली आहे. प्रत्येक पक्षाचे नेते महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे ‘आपल्याला तिकिट मिळणारच’ या विचाराने प्रत्येक इच्छूक आपापल्या प्रभागात सक्रीय झाला आहे. फलकबाजी सुरू आहे. सण, उत्सव, समारंभात हजेरी लावत आहेत. त्याची झलक गणेशोत्सवात बघायला मिळाली. अनेकांनी सार्वजनिक गणेश मंडळे व काही गृहनिर्माण सोसायट्यांच्या कार्यक्रमांना, आरतींना हजेरी लावून ‘महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक म्हणून आपले ब्रॅंडिंग’ केले आहे. मोठ्या रकमेच्या देणग्या आणि ‘आपली कामे’ करण्याची आश्वासने दिली आहेत. आता नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांच्या कालावधीत होणाऱ्या ‘संभाव्य खर्चाचे, देणग्यांचे, विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचे बजेट’ काढले जात आहे. त्यासह निवडणूक लढणे व कार्य अहवाल तयार करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू आहे. काहीही झाले तरी, महापालिका निवडणूक लढवायचीच असा ठाम निश्चय इच्छुकांनी केल्याचे वातावरण शहरात आहे.
अनुभवाचे बोल अन् जिंकण्याचा निर्धार...
१) चार सदस्यांचा प्रभाग असल्याने परिसर खूप मोठा होता. तरीही मागच्या वेळेस आमचे पॅनेल थोडक्यात पडले. आता परिस्थिती बदलली आहे. प्रभाग तेवढाच आहे. पण, आमच्या भागात लोकसंख्या पर्यायाने मतदार वाढले आहेत. त्यामुळे आमचा विजय नक्की आहे. काहीही झाले तरी कोणत्याही परिस्थितीत आम्हाला पॅनेल काढायचे आहे.
२) काही जण आम्हाला सोडून गेले, काही नवीन मिळाले आहेत. प्रभाग मोठा असला तरी नगरसेवक असताना पाच वर्षे केलेली कामे आणि गेल्या साडेतीन वर्षात मतदारांशी सातत्याने ठेवलेला संपर्क, यामुळे आपले काम लोकांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे समोर कोणीही उभा असला तरी विजय आपलाच होणार आहे. लोकांच्या संपर्कात राहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
३) आमच्या भागात यावर्षी गणेश मंडळे खूप होती. शिवाय, सोसायट्यांची संख्याही खूप वाढली आहे. प्रत्येक सोसायटीत कार्यक्रम होते. अनेक जण आरतीला बोलावत होते. इच्छूक म्हणून जावेच लागले. आरतीला गेलो म्हणजे वर्गणी द्यावीच लागली. मंडळांना पन्नास हजार आणि सोसायट्यांना एक लाख रुपये असे देणग्याचे स्वरूप होते. काय करणार? द्यावेच लागले.
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.