धान्य दाखल मात्र ‘आनंदाचा शिधा’ गायब
पिंपरी, ता. ६ : पिंपरी-चिंचवड शहरात यंदा दिवाळीपूर्वीच स्वस्त धान्य दुकाने गहू-तांदळाने भरली असली तरी, दरवर्षी मिळणारा ‘आनंदाचा शिधा’ यंदा नाही, ही खंत मात्र शिधापत्रिकाधारकांमध्ये दिसून येत आहे. दिवाळी जवळ आली असतानाही शासनाकडून आनंदाचा शिधाबाबत कोणतीही सूचना न आल्याने नागरिकांना यंदा आनंदाचा शिधाविना दिवाळी साजरी करावी लागणार आहे.
शहरातील तीनही शिधापत्रिका कार्यालयांतर्गत धान्याचे वितरण गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाले आहे. काही ठिकाणी उद्यापासून (ता. ७) धान्य वाटपाला प्रारंभ होणार आहे. ऑक्टोबर महिन्याचे कोट्याचे धान्य दुकानदारांकडे पोहोचले असून, लाभार्थ्यांना ते दिले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात प्राधान्य कुटुंबातील आणि अंत्योदय असे मिळून चार लाख ९३ हजार ८७४ एवढे शिधापत्रिकाधारक आहेत. प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मिळते. तर, अंत्योदय कुटुंबातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांमागे दहा किलो गहू आणि २५ किलो तांदूळ मिळते.
यंदा दिवाळीतील ऑक्टोबर महिन्यातील धान्य शुक्रवारपासून (ता. ३) दुकानात वितरित करण्यात आले. त्याच्या वाटपालाही सुरुवात झाली असल्याचे अधिकारी आणि दुकानदार सांगत आहेत. दरवर्षी मिळणारा आनंदाचा शिधा या वेळी मात्र मिळणार नाही. राज्य शासनाने अद्याप त्याबाबत काही कळविले नसल्याने त्याचे वाटप करण्यात आले नाही.
पात्र लाभार्थी संख्या
- प्राधान्य कुटुंब - चार लाख ९० हजार १६४
- अंत्योदय कुटुंब - ३ हजार ७१०
कार्यालयनिहाय होणारे धान्य वाटप (मेट्रिक टनमध्ये)
चिंचवड / पिंपरी / भोसरी
१) प्राधान्य कुटुंब - गहू / ३३४.८५० / २९२.५५० / ३४१.८००
- तांदूळ / ५०४.४५० / ४३७.३०० / ५०८.७५०
२) अंत्योदय कुटुंब - गहू / २.००० / १५.९०० / १९.१५०
- तांदूळ / ५.०५० / ३९.७५० / ४७.९००
‘‘दरवर्षी आनंदाच्या शिधाचे किट वाटप उशिरा केले जायचे. ते वेळेत होणे गरजेचे आहे. तसेच यंदा अद्यापही आनंदाचा शिधा मिळणार की नाही, याबाबत सांगितलेले नाही. त्याचे वाटप होणे गरजेचे आहे.
- पुष्पा माने, शिधापत्रिकाधारक
‘‘दुकानांमध्ये धान्य दाखल झाले आहे. उद्यापासून धान्याचे वाटप केले जाणार आहे. मात्र, अद्याप आंनदाचा शिधाचे किट या वेळी दाखल झालेले नाही.
- विक्रम छाजेड, दुकानदार
‘‘यंदा दिवाळीपूर्वी धान्य दुकानात वितरित करण्यात आले आहे. त्याचे वाटपही सुरू झाले आहे. यंदा आनंदाचा शिधा वाटप केला जाणार नाही. तशा कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत.
- प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण व पुरवठा अधिकारी
---