महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Published on

पिंपरी, ता. ६ : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना सोमवारी (ता.६) जाहीर झाली. प्रारूप प्रभाग रचनेवर ३१८ हरकती व सूचना प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यापैकी प्रभागांच्या हद्दीबाबत केवळ दोन पूर्णतः मान्य, तर तीन अंशतः मान्य करण्यात आल्या आहेत. तसेच, प्रभागांच्या व्याप्ती अर्थात वर्णनाबाबत (नाव) एक पूर्णतः, तर दोन अंशतः मान्य करण्यात आल्या. म्हणजेच ३२ पैकी २९ प्रभागांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

महापालिकेत २०१७ मध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली. त्यापूर्वी निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, कोविड प्रतिबंधक नियम, राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा यामुळे निवडणूक वेळेत होऊ शकली नाही. त्यामुळे १४ मार्च २०२२ पासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त हेच कामकाज पहात आहेत. गेल्या साडेतीन वर्षांपासून निवडणुकीची प्रतीक्षा होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्यामुळे राज्य सरकारने चार सदस्यीय प्रभाग पद्घतीने १२८ जागांसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना तयार केली. त्यावर हरकती व सूचना मागवून सुनावणी घेतली. अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी नगरविकास विभागाला पाठवली होती. त्यावर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आणि इच्छुकांचा जीव भांड्यात पडला.

हरकतींवर सुनावणी
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट रोजी जाहीर झाली. त्यांवर प्राप्त ३१८ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यातील बहुतांश हरकती व सूचना एकसारख्या होत्या. त्यामुळे प्रभाग रचनेत बदल होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याबाबतची प्रतीक्षा सोमवारी संपली.

अशी झाली प्रभाग रचना
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना २०११ ची लोकसंख्या गृहित धरली आहे. कारण, कोविड प्रतिबंधक नियमांमुळे २०२१ मध्ये नियोजित जनगणना झाली नाही. शिवाय, प्रभाग करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात ब्लॉक निश्चित केले आहेत. त्यांसह प्रभाग रचना करताना नदी, नाले, मोठे रस्ते, मुख्य रस्ते, लोहमार्ग यांचा विचार करून सीमा ठरवल्या आहेत. त्यामुळे काही प्रभाग आकाराने मोठे तर काही आकारने लहान झाले आहेत.

तळवडे, वाकड, भोसरीतील प्रभागांत बदल
१) प्रारूप प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक एकमध्ये (चिखली-पाटीलनगर) समाविष्ट असलेली ताम्हाणेवस्ती अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक १२ मध्ये (तळवडे) समाविष्ट
२) प्रारूप प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक सहामधील (धावडेवस्ती- सद्‍गुरूनगर) गावजत्रा मैदान आणि महापालिका हॉस्पिटल भाग अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक सातमध्ये (भोसरी गावठाण- शीतलबाग- सॅंडविक कॉलनी) समाविष्ट
३) प्रारूप प्रभाग रचनेत प्रभाग २४ मधील (दत्तनगर- पडवळनगर) म्हातोबा वस्तीचा भाग अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग २५ मध्ये (वाकड- ताथवडे- पुनावळे) समाविष्ट

पूर्णतः आणि अंशतः मान्य हरकती
पूर्णतः मान्य हरकती : हद्दीत अंशतः बदल झालेले प्रभाग - क्रमांक एक चिखली पाटीलनगर- मोरेवस्ती व क्रमांक १२ तळवडे आणि क्रमांक सहा धावडेवस्ती-सद्‍गुरूनगर चक्रपाणी भाग व क्रमांक सात भोसरी गावठाण- शीतलबाग-सॅंडविक कॉलनी

अंशतः मान्य हरकती : हद्दीत अंशतः बदल झालेले प्रभाग - क्रमांक २४ थेरगाव दत्तनगर-पडवळनगर-गणेशनगर- गुजरनगर व क्रमांक २५ वाकड- ताथवडे- पुनावळे

व्याप्ती व वर्णनात बदल प्रभाग
- प्रभाग १० मोरवाडी-दत्तनगर-संभाजीनगर : अण्णासाहेब मगरनगर, टीपू सुलताननगर, बीएमएनएल परिसर, एमआयडीसी कार्यालय चिंचवड स्टेशन या भागाचा समावेश प्रभाग क्रमांक १० मध्ये होता आणि आहे. परंतु, नावात उल्लेख नव्हता, तो आता करण्यात आला आहे.

- प्रभाग ११ नेवाळेवस्ती-कृष्णानगर- शिवतेजनगर-अजंठानगर- घरकूल : भीमशक्तीनगर भागाचा समावेश प्रभाग ११ मध्ये होता आणि आहे. मात्र, नावात उल्लेख नव्हता, तो आता करण्यात आला आहे.

- प्रभाग २६ पिंपळे निलख- विशालनगर रक्षक सोसायटी : वाकड भागाचा समावेश प्रभाग क्रमांक २६ मध्ये होता आणि आहे, मात्र, नावात उल्लेख नव्हता, तो आता करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com