पिंपरी कॅम्पात अस्वच्छता; 
व्यापारी-ग्राहकांची गैरसोय

पिंपरी कॅम्पात अस्वच्छता; व्यापारी-ग्राहकांची गैरसोय

Published on

पिंपरी, ता. ७ : वाहतूक नियमनाचा अभाव, तुंबलेली चेंबर, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, पावसाळी वाहिन्यांची नादुरुस्ती आणि घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा या सर्वांचा परिणाम पिंपरी कॅम्प बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहारांवर होत आहे. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील या प्रमुख बाजारपेठेतील व्यापारी व ग्राहक दोघांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सणासुदीच्या काळात लोणावळा, राजगुरुनगर, मुळशी आणि परिसरातील ग्राहक पिंपरी कॅम्प बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. गणेशोत्सव, नवरात्र आणि दसरा सणात लाखो रुपयांची उलाढाल झाल्यानंतर आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मालसाठा केला आहे. मात्र, गर्दीच्या वेळी वाहतूक पोलिसांचा अभाव, रस्त्यांवरील अडथळे आणि अस्वच्छतेमुळे व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

वाहतूक नियमनाचा अभाव असल्याने पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी मार्गे येणारी वाहने अनियमितपणे रस्त्यावरून जात असल्याने आणि पिंपरी व चिंचवडकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी वाढल्याने कोंडी निर्माण होते. त्यामुळे व्यापारी तसेच ग्राहक दोघांनाही गैरसोय सहन करावी लागते. साई चौकातील भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होते. एकेरी मार्ग असूनही दुहेरी वाहतूक सुरू असल्याने गोंधळ वाढतो.
पावसाळी वाहिन्या मातीने भरून तुंबल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर वाहते आणि काही दुकानांतही शिरते. सांडपाणी वाहिन्यांची सफाई नियमित न झाल्याने चेंबर तुंबतात आणि सांडपाणी रस्त्यावर जाऊन परिसरात दुर्गंधी पसरते. घनकचरा व्यवस्थापनाची स्थितीही अत्यंत दयनीय आहे. बाजारपेठेत निर्माण होणारा कचरा वेळेवर उचलला जात नाही. दररोज सकाळी घंटागाडी येत असली तरी संपूर्ण परिसरातील कचरा उचलला जात नाही, त्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढली आहे. या सर्व समस्या पालिकेकडून वेळेवर न सोडवल्याने व्यापारी आणि ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

भाजी मंडई कचऱ्याच्या विळख्यात
पिंपरी कॅम्प बाजारपेठेजवळील भाजी मंडईतही अस्वच्छतेचे चित्र आहे. टाकाऊ पालेभाज्या, फळे आणि इतर वस्तूंची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. सायंकाळी कचऱ्याच्या कुंड्या ओसंडून वाहतात, त्यामुळे दुर्गंधी आणि मोकाट जनावरांचा त्रास वाढतो. हा कचरा दुसऱ्या दिवशी सकाळीच उचलला जातो, तोपर्यंत नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो.

‘‘गाड्या आल्यावर माल खाली करण्यासाठी आम्हांलाच कोंडीतून वाट काढत दुकानापर्यंत पोहोचावे लागते. कचरा वेळेत उचलला जात नाही, पावसाळ्यात पावसाळी वाहिन्या तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर वाहते, तर मोकाट कुत्र्यांचा त्रास वेगळाच. या सर्व समस्यांमुळे ग्राहक नाराज होतात आणि आमच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होतो.
- रिंकू शेख, स्थानिक व्यापारी

‘‘कुठेही कचरा टाकणे किंवा साठवणे बंदी आहे. असे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. कचरा संकलन गाडीच्या वेळा निश्चित आहेत. नागरिकांनी तो कचरा थेट गाडीतच टाकावा. पावसाळ्यात झालेल्या गैरसोयीवर तातडीने उपाययोजना सुरू आहेत.
- अजिंक्य येळे, सहाय्यक आयुक्त, क क्षेत्रीय कार्यालय
PNE25V58059, ५८०६३
---

Marathi News Esakal
www.esakal.com