सोशल मिडीयावर फोटो अपलोड करताय, सावधान!

सोशल मिडीयावर फोटो अपलोड करताय, सावधान!

Published on

पिंपरी, ता. ७ : आजच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्तीच ‘ऑनलाइन अस्तित्व’ हे त्याच्या प्रत्यक्ष ओळखीइतकेच महत्त्वाचे बनले आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट किंवा एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले फोटो शेअर करणे, पोस्ट टाकणे हा रोजच्या आयुष्याचा भाग झाला आहे. पण या सवयीमागे आता एक गंभीर सायबर धोका लपलेला आहे. एआयच्या (आर्टिफिशियल इंटिलिजिन्स) माध्यमातून फोटोमध्ये छेडछाड करणे आणि त्यांचा गैरवापर करण्याच्या प्रकार वाढत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातही असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून असे प्रकार घडत असून, ज्यात विक्षिप्त वृत्तीच्या व्यक्तींनी इतरांच्या फोटोंचा वापर करून ‘एआय जनरेटेड’ अश्लील किंवा विकृत प्रतिमा तयार केल्या आणि त्या सोशल मीडियावर प्रसारित केल्या. काही प्रकरणांमध्ये या बनावट प्रतिमांमुळे पीडितांना मानसिक त्रास, समाजात बदनामी आणि धमक्या सहन कराव्या लागल्या आहेत. बहुतांश प्रकरणांमध्ये महिला आणि तरुण मुली लक्ष्य बनतात. काही वेळा हे फोटो ब्लॅकमेलिंगसाठी, बदनामीसाठी वापरले जातात. दहा दिवसांपूर्वी चिखली पोलिस ठाण्यातही असा एक गुन्हा दाखल झाला.

तांत्रिक सापळा कसा रचला जातो?
१. वापरकर्ता सोशल मीडियावर फोटो अपलोड करतो
२. विक्षिप्त प्रवृत्तीची व्यक्ती तो फोटो डाऊनलोड करते
३. नंतर एआय सॉफ्टवेअरच्या साहाय्याने त्या चेहऱ्याचे रूपांतर करून तो दुसऱ्या शरीरावर बसवला जातो
४. अश्लील अथवा भ्रामक प्रतिमा तयार केली जाते आणि ती सोशल मीडियावर शेअर केली जाते किंवा संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल केले जाते.

काय आहे धोका?
१. खोटे खाते वापरून सतत त्रास दिला जातो
२. लोकेशन ट्रॅकिंग अॅप्सद्वारे महिलांचा माग काढला जातो
३. स्मार्ट डिव्हायसेस हॅक करून खासगी क्षण रेकॉर्ड केले जाऊ शकतात
४. कोणत्याही व्यक्तीचा फोटो वापरून अश्लील, खोटा व्हिडिओ अथवा फोटो तयार करणे काही मिनिटांत शक्य
----------
उपाययोजना
१. डिजिटल ओळख जपणे : पत्ता, मोबाईल नंबर, दैनंदिन हालचाली अशा गोष्टी सोशल मीडियावर टाकणे टाळा फक्त विश्वासार्ह व्यक्तींनाच प्रोफाइल व फोटो दिसतील अशी सेटिंग करा
२. ऑनलाइन खाते सुरक्षित ठेवा : मजबूत पासवर्ड ठेवा व नियमित बदला. अनोळखी डिव्हाइसवरून लॉगिन झाले आहे का ते तपासा
३. मोबाईल अॅप्स व डिव्हाईस वापरात काळजी : अनावश्यक परवानग्या (कॅमेरा, माईक, लोकेशन) देऊ नका. स्मार्ट डिव्हाइसेसचे डिफॉल्ट पासवर्ड बदला. डिव्हाईस अपडेट ठेवून सुरक्षा भेद दुरुस्त करा
४. एखादी बनावट प्रतिमा तयार झाली असल्यास ती नष्ट न करता पुरावा म्हणून जतन करा

गुन्हा दाखल
एका तरुणीचा इंस्टाग्रामवरील फोटो घेत एआयवर एडिट करून त्या फोटोतील पोशाख बदलून अश्लील फोटो तयार केला. हा अश्लील फोटो तरुणीसह इतरांना पाठवून तरुणीची बदनामी केली. या प्रकरणी २३ सप्टेंबरला चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

असा एखादा प्रकार घडल्यास ब्लॉक, रिपोर्ट व स्क्रीनशॉट/रेकॉर्डिंग सांभाळून ठेवा. सायबर सेल, महिला हेल्पलाईनकडे तक्रार करा. यातील आरोपींवर आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होतो. मदतीसाठी महिला हेल्पलाइन १०९१ किंवा सायबर क्राईम पोर्टलचा वापर करा.
- रविकिरण नाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

Marathi News Esakal
www.esakal.com