‘लाइव्ह लोकेशन’पासून एसटी भरकटलेलीच

‘लाइव्ह लोकेशन’पासून एसटी भरकटलेलीच

Published on

अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ७ : ‘एसटी महामंडळा’च्या ‘आपली एसटी’ या ॲपचे लोकार्पण राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहुर्तावर करण्यात आले. पण, फक्त तिकीट आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच बस क्रमांक किंवा सेवा क्रमांक टाकून बसचे ‘लोकेशन’ पाहता येत आहे. एसटीच्या एकूणपैकी सरासरी दीड ते दोन टक्के प्रवासीच तिकीट आरक्षित करुन प्रवास करतात. त्यामुळे कोट्यवधीचा खर्च करुन त्या प्रवाशांसाठीच हे ॲप विकसित केले का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे १३ हजारांहून अधिक बसेस आहेत. त्यामधून दररोज सरासरी ४५ लाख नागरिक प्रवास करतात. संबंधितांना बसचे लाइव्ह लोकेशन, तिकीट आरक्षण, जवळील बसस्थानक, मार्ग आणि तक्रार अशा सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी एसटी महामंडळाने मोबाइल ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी २०१८-१९ मध्ये ‘रोझामार्टा ऑटोटेक कंपनी’ला ताफ्यातील सर्व बसला ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम’ (व्हीटीएस) प्रणाली आणि एसटी स्थानकामध्ये प्रवाशांना इत्यंभूत माहिती मिळावी यासाठी पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिम (पीआयएस) स्क्रीन बसविण्याचे कंत्राट दिले होते. यासाठी महामंडळाने ३२ कोटी ५५ लाख ३४ हजार ४२५ रुपये मंजूर केले. या कंपनीकडून गेल्या सात वर्षांत १३ कोटी ३२ लाख ४० हजार रुपये खर्च करून ‘व्हीटीएस प्रणाली’ आणि ‘पीआयएस’ स्क्रीन बसविण्यात आल्या आहेत. मात्र, संबंधित ॲप सात वर्षांनंतरही सुरू झाले नव्हते. अखेर आता त्याचे लोकार्पण करण्यात आले. ‘एमएसआरटी कम्युटर्स’ या नावाने प्ले स्टोअरवर ॲप उपलब्ध आहे. मात्र, त्यात सर्वसामान्य प्रवाशांना बसचे लाइव्ह लोकेशन दिसत नाही. तसेच काही बस स्थानकात येऊन जात आहेत, तरी त्यांची माहिती ॲपवर अपडेट होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

- ॲपमध्ये असलेल्या सेवा
जवळच्या बस स्थानकाची माहिती
बस कोठून सुटणार, थांब्यावर कधी पोहचणार
बसचे वेळापत्रक

- या सुविधांची अपेक्षा
इच्छितस्थळाचे नाव टाकल्यास प्रवासी जेथे आहे, तेथून जवळच्या स्थानकावर येणारी बस आणि वेळेची माहिती
इच्छित ठिकाणी जाण्यासाठी लागणारा संभाव्य वेळ
ॲपवरूनच तिकिटाचे बुकिंग करता यावे
तिकिटाचे पैसे ऑनलाइन भरण्याची सुविधा

- प्रवाशांना जाणवलेल्या त्रुटी
‘ट्रॅक युअर बस’ पर्यायावर क्लिक केल्यावर बस नंबर आणि बस सर्व्हिस नंबर पर्याय उपलब्ध होतो. त्यात बसचा क्रमांक टाकावा लागतो
राज्यात एसटीच्या १३ हजारांहून अधिक बस दररोज धावतात. या सर्व बसचे नंबर कसे माहिती असणार?
- सर्व्हिस नंबर या पर्यायावर क्लिक केल्यावर सर्व्हिस नंबर टाकावा लागतो
- पण, तिकीट बुकिंग केल्याशिवाय सर्व्हिस नंबर येत नाही
- त्यामुळे एसटी बसच्या लाइव्ह ट्रॅकिंग सुविधेचा सर्वसामान्य प्रवाशांना उपयोग होत नाही
- ॲपवर बसचे वेळापत्रक उपलब्ध नाही
- बऱ्याच बस अजूनही लाइव्ह केलेल्या नसल्यामुळे त्यांचे ‘ट्रॅकिंग’ होत नाही.

नव्याने सुरू झालेल्या ॲपमध्ये सामान्य प्रवाशांना बसचे लाइव्ह लोकेशन दिसत नाही. ॲपमध्ये बऱ्याच तांत्रिक त्रुटी आहेत. ॲफ पूर्णपणे विकसित नसताना उद्घाटनाची घाई का केली ?
- संजय शितोळे, प्रवासी

एसटीचे नवे ॲप सध्या प्राथमिक टप्यात आहे. प्रवाशांच्या सूचनांच्या आधारे ॲपमध्ये बदल केले जात आहेत. ॲप पूर्णपणे विकसित होण्यासाठी आणखी काही कालावधी जाणार आहे.
- नितीन मैद, वाहतूक महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com