

आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २८ : इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा आणि ‘पॅट’ परीक्षा एकाचवेळी एप्रिल अखेरपर्यंत घेण्याच्या निर्णयावर पालक आणि शिक्षकांकडून रोष व्यक्त होत आहे. अशा नियोजनाला शिक्षकासह पालकांनी विरोध केला आहे.
शाळांमध्ये वार्षिक परीक्षांची तयारी झाल्यावर ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांनी एप्रिलच्या उन्हात विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा आणि ‘पॅट’ परीक्षा आठ ते २५ एप्रिल या कालावधीत घेऊन, एक मे रोजी निकाल प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
‘‘पॅट परीक्षेच्या तीन पेपरचे वेळापत्रक, नियोजन देणे ठीक आहे. सर्व विषयांचे वेळापत्रक राज्यस्तरावरून देण्याची मुळीच आवश्यकता नाही. हे नियोजन शाळांच्या व्यवस्थापनावर सोपवणे योग्य आहे. मात्र, या वेळापत्रकामुळे शाळा व्यवस्थापनावर सरकारने एक प्रकारे अविश्वास दाखवला आहे,’’ अशी शाळाचालक आणि शिक्षकांची भावना झाली आहे. ‘‘बहुसंख्य शाळांमध्ये साधारणपणे १५ एप्रिलपर्यंत वार्षिक परीक्षा घेतल्या जातात. पेपर तपासणीचे गुण ऑनलाइन पोर्टलला भरायचे या प्रक्रियेसाठी अवघे पाच दिवस उरतात. २५ तारखेपर्यंत परीक्षा घेऊन एक तारखेला निकालपत्रक विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. पेपर तपासणे, निकालपत्रक तयार करणे ही प्रक्रिया वेळखाऊ असते. अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांना पाच दिवसांत सर्व विषयांचे पेपर तपासून निकाल तयार करणे हे मोठे आव्हान असणार आहे,’’ असे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी सांगितले.
उन्हामुळे मुलांच्या शाळा सकाळी असल्या, तरी तापमान वाढल्यावर शाळा सुटणार आहे. त्यामुळे अधिक त्रास होऊ शकतो. शिक्षण विभागाने मुलांवर फार ताण देऊ नये. लवकर परीक्षा घ्याव्यात. त्यांनाही विश्रांतीची गरज असते. उन्हाळी आणि दिवाळी या मुलांच्या हक्काच्या सुट्ट्या असतात.
- सुजाता जाधव, पिंपरी
पालक आणि शिक्षकांना वेठीस धरण्याचा अधिकार यांना कोणी दिला? दिवसेंदिवस उन्हाचा प्रकोप वाढत आहे, त्याचा त्रास मोठ्यांना होतोय तर त्या कोवळ्या बालकांचे काय? सर्व शाळा जूनत सुरू कराव्यात.
- स्मिता शिंदे, रावेत
एप्रिलमध्ये उन्हाचा पारा प्रचंड असतो. लहान मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो. काही ठिकाणी वर्ग खोल्यांना पत्रा आहे. त्यामुळे किमान पहिली ते पाचवीच्या मुलांच्या परीक्षा १० एप्रिलपर्यंत घेण्यात याव्यात.
- पूजा कुलकर्णी, चिंचवड
शिक्षण विभागाने १५ एप्रिलपूर्वी परीक्षा घेऊन, शाळांना लवकर सुट्ट्या जाहीर कराव्यात. गेल्या काही वर्षांपासून तापमान वाढत असल्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
- ऋषिकेश पवार, निगडी
प्रत्येक शाळेचे शैक्षणिक वर्षाचे नियोजन वर्ष सुरू होण्यापूर्वीच निश्चित असते. वर्षाच्या शेवटीच अचानक राज्य सरकारने २५ एप्रिलपर्यंत शाळा-परीक्षा आणि पुढील चार दिवसांत निकाल, असा फतवा काढल्याने हे नियोजन कोलमडले असून अनेक गोंधळ निर्माण झाले आहेत. या अडचणी लक्षात घेऊन सरकारने त्याचा फेरविचार केला पाहिजे.
- महेंद्र गणपुले, प्रवक्ते, मुख्याध्यापक संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.