

पिंपरी, ता. २८ : पर्यटन व्हिसावर आलेल्या बांगलादेशी महिलेसोबत चिखलीतील वेल्डिंग व्यावसायिकाने लग्न केले. यातून तिला येथे आश्रय देण्यात आला. या महिलेसह तिच्या पतीला चिखली पोलिसांनी अटक केली. तिच्या सतरा वर्षीय मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई कुदळवाडी येथे करण्यात आली.
मोहम्मद राणा मोहम्मद सलाम शेख (वय ३३, रा. तळवडे गावठाण, मूळ - उत्तर प्रदेश) आणि त्याची बांगलादेशी घुसखोर पत्नी (वय ३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘संबंधित महिलेचा पहिला पती बांगलादेशात राहतो. ही महिला २०१५ पासून भारतात पर्यटन व्हिसावर येत-जात होती. दरम्यान, तिची उत्तर प्रदेशातील मोहम्मद राणा याच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली. डिसेंबर २०२१ मध्ये तिने पुन्हा पर्यटन व्हिसा काढला आणि मोहम्मद राणा याला भेटायला ती चिखली येथे आली. ती पहिल्या पतीपासूनच्या १६ वर्षीय मुलालाही घेऊन आली होती. महिला बांगलादेशी घुसखोर आहे, हे माहिती असतानाही मोहम्मद याने २०२१ मध्ये तिच्याशी लग्न केले. तिच्यापासून त्याला सव्वा वर्षाचा एक मुलगा आहे. महिलेची पर्यटन व्हिसाची मुदत ७ एप्रिल २०२२ रोजी संपली. त्यानंतर बांगलादेशी महिलेला तिच्या देशात परत पाठवणे आवश्यक असताना शेख याने त्याच्या घरात तिला आश्रय दिला.’’ याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी बांगलादेशी महिलेसह मोहम्मद राणा याला अटक केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे करीत आहेत.
पासपोर्ट जाळला, आधार कार्ड बनावट
आपण बांगलादेशी असल्याचे कोणाला समजू नये, यासाठी महिलेने आणि तिचा आणि मुलाचा बांगलादेशी पासपोर्ट जाळून नष्ट केला. भारतीय असल्याचे भासविण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मतदान ओळखपत्रही बनवून घेतले.
पोलिस ठाण्याच्या स्थापनेपासून चिखली हद्दीत पहिल्यांदाच बांगलादेशी व्यक्ती सापडला आहे. या आरोपींकडे लग्न केल्याबाबतची कोणतीही कागदपत्रे नाहीत. तसेच इतरही तपास केला जात आहे.
- विठ्ठल साळुंखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.