पारंपारिक पद्धतीने नववर्षाचे उत्साहात स्वागत

पारंपारिक पद्धतीने नववर्षाचे उत्साहात स्वागत
Published on

पिंपरी, ता. ३० ः चैत्र प्रतिपदा अर्थात हिंदू नववर्षाचा प्रारंभाचा दिवस गुढीपाडवा रविवारी शहरात विविध कार्यक्रमांनी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला. घरोघरी पहाटेपासूनच गुढी उभारण्याची आणि गोडाधोडाचा नैवेद्य करण्यासाठी लगबग सुरू होती. काही भागांत सकाळी; तर काही भागांत संध्याकाळी पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुका काढण्यात आल्या. महिला आणि मुलांचा सहभाग लक्षणीय होता. चित्ररथ, लेझीम पथक, ढोलताशा पथक, महिलांचे मर्दानी खेळ, वारकरी दिंडी अशा वातावरणात निघालेल्या मिरवणुकांमध्ये पुरुषांसह महिलांनीही फेटे परिधान केले होते. नऊवारी साडी आणि मराठमोळा पेहराव महिलांनी केला होता. एकमेकांना शुभेच्छा देत नववर्षाचे स्वागत झाले.
शहरातील पिंपरी, चिंचवड, वाकड, सांगवी, भोसरी, निगडी, आकुर्डी, डुडुळगाव, चऱ्होली, मोशी, पुनावळे, ताथवडे अशा गावठाणांसह नवीन विस्तारित भागांमध्ये नववर्ष स्वागतानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ठिकठिकाणी आयोजित मिरवणुका प्रमुख आकर्षण होते. ढोल-ताशांचा दणदणाट आणि महिलांचे मर्दानी खेळ, वारकरी विद्यार्थ्यांची दिंडी आणि भगवा ध्वज नाचवत मिरवणुका निघाल्या. लहान मुलांसह महिलांचा सहभाग लक्षवेधी होता.

चिंचवडगावात उत्साह
चिंचवडगावातील श्रीधरनगर येथील श्री दत्त मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. संस्कृती संवर्धन व विकास महासंघ आणि समविचारी संस्थांनी मिरवणुकीचे आयोजन केले. त्यामध्ये विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. चित्ररथ हे मुख्य आकर्षण राहिले. पारंपरिक वेशभूषा करून नागरिक सहभागी झाले. भजनाच्या साथीने टाळ मृदंगाचा गजर होता. समर्थ रामदास स्वामी चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (लिंक रस्ता), कालिका माता मंदिर, शिवाजी उदय मंडळ तानाजीनगर, काकडे पार्क चौक, विवेक वसाहत चौक, केशवनगर शाळा, विठ्ठल-रखुमाई मंदिर, जुना पॉवर हाऊस चौक, गांधी पेठ, संत ज्ञानेश्वर मंडळ, श्री मोरया गोसावी समाधी मंदिर मार्गे मिरवणूक निघाली. श्री धनेश्वर मंदिर येथे समारोप झाला.

मोशीत महिलांचा सहभाग
मोशी येथील मिरवणुकीचे नेतृत्व महिलांनी केले. त्यामध्ये महिलांचे झांज पथक, ढोल ताशा पथक होते. तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा आदी मर्दानी खेळांचे सादरीकरणही महिलांनीच केले. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून मोशीतील वुडस् विले सोसायटीपासून सकाळी मिरवणुकीस प्रारंभ झाला. शिव रस्ता ते स्वराज रेसिडेन्सी चौक या मार्गाने मिरवणूक निघाली. वेशभूषा स्पर्धेत सहभागी मुलांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. महिलांनीही पारंपरिक वेशभूषा केली होती.

पुनावळे-ताथवडेत जल्लोष
पुनावळे - ताथवडे येथील हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे आयोजित मिरवणुकीस गायकवाडनगर येथील १८ लॅटिटुड मॉल येथून प्रारंभ झाला. सोमाणी सोसायटी, सिद्धशिला ईला सोसायटी मार्गे मिरवणूक निघाली. पुनावळेतील श्री बालाजी मंदिर येथे समारोप झाला. सर्वांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. मिरवणुकीत आयटीयन्सचा मोठा सहभाग राहिला.

वाकडमध्ये उत्साह
वाकड येथील हिंदू नववर्ष स्वागत समितीने तीन ठिकाणांहून मिरवणुका काढल्या. प्रथम सोसायटी - युरो स्कूल - ग्लोबल पंजाब - उत्कर्ष चौक - माउली चौक - कोस्टारिका सोसायटी - श्रीराम मंदिर - शोनेस्ट टॉवर; वेदांता सोसायटी - ईरानी कॅफे चौक - प्रिस्टीनप्रो लाईफ - माउली चौक - कोस्टारिका सोसायटी - श्रीराम मंदिर - शोनेस्ट टॉवर आणि शोनेस्ट टॉवर - श्रीराम मंदिर - चौधरी पार्क - यशवंत अपार्टमेंट - आदर्श कॉलनी रोड - कॅपिटल टॉवर - सम्राट चौक - कोस्टारिका सोसायटी - श्रीराम मंदिर - शोनेस्ट टॉवर अशा तीन मार्गांनी मिरवणुका निघाल्या. पारंपरिक ढोल-ताशा पथक, महिलांचे हळदी-कुंकू, बाल वेशभूषा स्पर्धा, मर्दानी खेळ, वारकरी पथक, बाल प्रोत्साहन पुरस्कार असे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. त्यामध्ये १०० ढोल - ताशा पथके, १०० वारकरी संघ, २० मल्लखांब संघ, २० नृत्य पथके, २० मर्दानी खेळ सादरकर्ते, ४० बत्तीवाले, २० बैलगाडी व घोडागाडी रथ मिरवणुकीत सहभागी झाले. दोन ठिकाणी रिंगण सोहळा झाला.

सांगवीत मिरवणूक
गुढीपाडव्यानिमित्त जुनी सांगवीतील गणपती मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. त्यात वारकरी भजनी मंडळाने ‘ज्ञानोबा माउली, तुकाराम’चा गजर केला. श्रीराम रथ साकारला होता. पालखीमध्ये पादुका होत्या. भगवा ध्वजधारी मिरवणुकीत पुढे चालत होते. ध्वज नाचवून विजयाची अनुभूती दिली. मधुबन सोसायटी, शितोळे चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक, जय भवानी माता मंदिर, एकता चौक, महादेव मंदिर मार्गे मिरवणूक श्रीराम मंदिरापर्यंत काढण्यात आली. त्यात सहभागी नागरिक, महिला, मुलांनी पारंपरिक वेशभूषा केला होती.

पाडव्याच्या निमित्ताने आरोग्याचा गोडवा
हिंदू नववर्ष स्वागतासाठी चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानिमित्त शहरात ठिकठिकाणी सजावट केली होती. गुढी उभारण्यासाठी काठी, गुढीचे वस्त्र, साखरेच्या गाठी व कडुलिंबाची डहाळी खरेदीसाठी सकाळीच गर्दी झाली होती. सकाळी दारात गुढी उभारून काहींना आमरस -पुरी; तर काहींनी श्रीखंड-पुरीचा नैवेद्य दाखवला. गूळ व कडुनिंबाची पाने एकत्र वाटून प्रसाद केला होता.


आरोग्यासाठी...
कडुलिंब ः गुढीला कडुलिबांच्या कोवळ्या पानांची डहाळी बांधून गूळ व कडुनिंबाची पाने प्रसाद म्हणून वाटली जातात. गूळ हा स्निग्ध व मधूर असतो. तर कडुनिंब हा पित्तनाशक असतो. या दोघांच्या गुणांमध्ये उन्हाळ्यात शरीराला जाणवणारा कोरडेपणा व उष्णता कमी होते.
साखरगाठी ः गुढीपाडव्याला लहान मुलांच्या गळ्यात साखरगाठी घालण्याची परंपरा आहे. साखर ही मधूर व शीत असते. ज्यामुळे उन्हाळ्यात येणारा थकवा दूर होतो. गुळ दिला जातो. स्निग्ध व मधूर आहे.
नवीन कपडे ः गुढीला नवीन सुती वस्त्र बांधण्याची पद्धत आहे. त्यामागे उन्हाळ्यात नागरिकांनीही सुती कपडे घालावेत वापरावेत, असा उद्देश असतो.

आंबा ः आंबा हा मधूर व पोषण देणारा आहे. तो खाण्यापूर्वी काही काळ पाण्यात ठेवल्यास शरीराला थंडावा मिळतो म्हणूनच गुढीपाडव्याला आमरसाचा नैवेद्य दाखविला जातो. तसेच घरी बनवलेल्या चक्क्यापासून केलेले श्रीखंडही आरोग्यास उत्तम असते. त्यामुळे काही भागांत आमरस पुरी; तर काही भागांत श्रीखंड पुरीचाही नैवेद्य केला जातो.

वर्षातील पहिला सण गुढीपाडवा हा ग्रीष्म ऋतूमध्ये येतो. त्यामुळे उन्हाळ्यातील हवामान बदलापासून शरीराचे संरक्षण व्हावे व ऋतुचक्राला अनुसरून आहार घेतला जावा, यासाठी गुढीपाडव्याच्या पूजेत साखरगाठी, कडुलिंब, गूळ यांचा समावेश असतो. उन्हाळ्यात आंब्याचे सेवन करणेही आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. त्यामुळे या सणापासून आमरस खाण्यास सुरुवात केली जाते.
- डॉ. नीलेश लोंढे, आयुर्वेदाचार्य, भोसरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com