राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठेची तर राष्ट्रवादीला (एसपी) हवी नवसंजीवनी

राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठेची तर राष्ट्रवादीला (एसपी) हवी नवसंजीवनी

Published on

पक्ष''नामा’ ः राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष

प्रतिष्ठेची लढाई;
हवी ‘नवसंजीवनी’

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या जनसंवाद सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपकडे गेलेली सत्ता पुन्हा एकदा हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. तर राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सध्या राजकीय नवसंजीवनीची गरज असल्‍याची भावना व्‍यक्‍त होत आहे.
- प्रदीप लोखंडे

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर २००२ पासून २०१७ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची जवळपास एकहाती सत्ता होती. त्यापूर्वी आणि नंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराच्या विकासासह राजकीय समीकरणांवर आपली पकड मजबूत ठेवली होती. विरोधी पक्ष नेत्यापासून ते स्थायी समित्यांपर्यंत सर्व ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र, २०१४ नंतरच्या राजकीय उलथापालथीमुळे सत्ता समीकरणात आमूलाग्र बदल झाला. भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे अजित पवारांचे अनेक विश्वासू कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले. परिणामी, २०१७ च्या निवडणुकीत भाजपने महापालिकेवर कमळ फुलवत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. पक्षाचे केवळ ३६ नगरसेवक विजयी झाले. राज्य आणि केंद्रातील राजकीय बदलांचा परिणाम थेट शहराच्या राजकारणावर झाला. अजित पवारांनी शहरातील पदाधिकाऱ्यांवरील नाराजी व्यक्त केली होती. त्याच काळात मावळ लोकसभेत त्यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर काही काळ अजित पवारांनी शहरातील राजकारणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. पण राज्यात सत्तेची नवी समीकरणे निर्माण झाल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा शहराकडे मोर्चा वळवला आहे.
पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी अजित पवारांनी जनसंवाद सभा घेऊन कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. पिंपरीतील सभेला नागरिक आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने राष्ट्रवादीचे मनोबल उंचावले आहे. सभेनंतर अजित पवारांनी जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांची व्यक्तिगत भेट घेऊन त्यांना चार्ज करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेवरील सत्ता परत मिळविण्यासाठी त्यांनी थेट जनसंपर्क मोहिमेवर भर दिला आहे. रखडलेल्‍या प्रश्‍नांचा आढावा घेतला. या बरोबरच हिंजवडी, चाकण, पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी धडाकेबाज निर्णय घेत प्रशासनाला गतिशील केले आहे. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍यासोबत ३० माजी नगरसेवक असल्याचे सांगितले जाते, तर काहीजण ‘घरवापसी’ करून पुन्हा राष्ट्रवादीकडे वळले आहेत. चिंचवड आणि भोसरी येथे लवकरच अजित पवार यांच्या बैठका होणार असून, तिथेही स्थानिक पदाधिकाऱ्यांना सक्रिय करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यांच्या या हालचालींमुळे भाजपसह इतर पक्षांमध्येही हालचाल सुरू झाली आहे. शहरातील विकासकामे, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, गृहनिर्माण आणि औद्योगिक धोरणे यासारख्या मुद्द्यांवर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली, तर येत्या निवडणुकीत चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संघटनात्मक अडचणी
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सध्या संघटनात्मक अडचणीत सापडला असून, पक्षाला नवसंजीवनी मिळण्याची तातडीची गरज आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील काही कार्यकर्त्यांनी थेट खासदार शरद पवार यांची भेट घेऊन पक्षाशी निष्ठा कायम असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यानंतर स्वतः शरद पवार यांनी शहराच्या संघटनात्मक स्थितीकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते. पवारांनी कार्यकर्त्यांना खचून न जाता कामाला लागण्याच्‍या सूचना केल्‍या. त्या अनुषंगाने पक्षाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शहराध्यक्ष पदासह अनेक पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र, या नियुक्त्यांनंतर पक्षातील नाराजीचे वातावरण आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बैठकांचे सत्र राबविले. वाकड येथे पक्षाचा मेळावा आयोजित करून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तर कासारवाडी येथे पक्षातील
पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून भावना जाणून घेतल्‍या. या दोन्ही बैठकीत काही कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे शहराध्यक्ष बदलाची मागणी केली. मात्र, शरद पवार यांनी सध्याच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शहराध्यक्ष बदलास ‘रेड सिग्नल’ दाखविला. त्यांनी पक्षातील सर्व गटांना एकत्र आणून काम करण्याचे आवाहन केले. दरम्यान, पवार यांचे विश्वासू आणि ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्याशी समन्वय साधून शहरातील संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने काही निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही शहर संघटनेला बळकटी देण्यासाठी आठवड्यातून एकदा जनसंपर्क साधण्याचे आश्वासन दिले आहे.

निवडणुका स्‍वबळावर की...
महायुतीमधून लढल्‍यास आपल्‍याला उमेदवारी मिळणार नाही, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांना आहे. त्‍यामुळे आपण स्‍वतंत्र निवडणुका लढवायला हव्‍यात, अशा चर्चा होत आहेत. अद्याप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्‍यावर कोणताही निर्णय दिलेला नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्‍या वतीने निवडणुका महाविकास आघाडी मधून लढल्‍या पाहिजेत, अशा भावना व्‍यक्‍त होत आहेत. खासदार शरद पवार यांनी देखील यासाठी हिरवा कंदील दाखविला असल्‍याचे संकेत आहेत. त्‍यामुळे आगामी काळात निवडणुका स्‍वबळावर होणार की मित्र पक्षांसोबत युती करून हे पहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com