सरकारनामा स्थानिक निवडणुका अंक नियोजन

सरकारनामा स्थानिक निवडणुका अंक नियोजन

Published on

पक्ष''नामा’ ः आरपीआय, मनसे, वंचित, आप आणि इतर
--
प्रयत्नांची पराकाष्ठा

महायुती आणि महाविकास आघाडीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), वंचित बहुजन आघाडी यांच्यासह आम आदमी पक्ष, माकप, भाकप, बसप यांचीही तयारी सुरू आहे. सर्वच नेत्यांनी बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. यात पक्षाचा आढावा, ध्येय धोरणे, राजकीय भूमिका आणि उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. सर्वच राजकीय नेत्यांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
- आशा साळवी

म हापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार म्हणजेच चार सदस्यीय पद्धतीने होणार आहे. त्यासाठी आरपीआयने (आठवले गट) मित्र पक्ष भारतीय जनता पक्षाकडे १५ जागा मागितल्या आहेत. किती जागा भाजप देणार की २०१७ प्रमाणे जागा देऊन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायला लागणार, हे भविष्यातील रणनितीवर ठरणार आहे. युती असल्याने सगळे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्तेही भाजपला धरून राहतात. रिपब्लिकन पक्षाकडून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने बैठका होत आहेत. पक्षाच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्याबरोबर प्राथमिक चर्चा केली असल्याचे समजते.

रिपब्लिकन पक्ष
रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनीच आतापर्यंत महापालिकेत पक्षाचे नेतृत्व केले आहे. दापोडी भाग पुणे महापालिकेत असताना १९९४ मध्ये पोटनिवडणुकीत पक्षाला यश मिळाले. १९९७ च्या निवडणुकीतही बाजी मारली. मात्र, १९९७ मध्ये दापोडीचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत झाला आणि २००२ ला पहिली निवडणूक झाली. २००२ मध्ये पक्षाच्या चार जागा निवडून आल्या होत्या. त्यावेळी तीन जणांचे पॅनेल होते व सोबतीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिन्ह होते. २००७ मध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये सोनकांबळे एकमेव निवडून आल्या. २०१२ ची निवडणूक भीमशक्ती-शिवशक्ती म्हणून लढवल्या गेली. त्या वेळीही रिपब्लिकन पक्षाला दापोडीची एकच जागा जिंकता आली. २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत युती होती. पक्षाच्या वाट्यावर तीन जागा आल्या. त्यातील केवळ एकच जागेवर विजय मिळाला. चिन्ह मात्र भाजपचे ‘कमळ’ होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मनसेचे पहिल्यांदा २०१२ च्या महापालिका निवडणुकीत चार नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह होता. अनेक तरुण मंडळी मनसेत सहभागी झाले होते. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीतही पक्षाला मोठे यश मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, तो पूर्ण चुकला आणि एका नगरसेवकावर पक्षाला समाधान मानावे लागले. आता मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष अर्थात ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यांना शहर पातळीवर किती फायदा होईल? कार्यकर्त्यांची भूमिका काय? याची चाचपणी सुरू आहे. त्यावरून येत्या निवडणुकीत कसे सामोरे जायचे? नगरसेवकांची संख्या कशी वाढवायची? याबाबतची चाचपणी सुरू असल्याचे दिसते. त्यामुळे मेळाव्यात पक्षाचे नेते काय सांगतात?, पक्षाची आगामी भूमिका काय असेल?, यावर चर्चा झाली. स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढवण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. आगामी निवडणुकीत पक्षासाठी चांगली कामगिरी करणे हे एक आव्हान आहे.

वंचित बहुजन आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा ठसा फारसा उमटला नव्हता. काही ठिकाणी उमेदवार उभे राहिले, पण प्रचारामध्ये स्पष्ट दिशा आणि संघटित मोहीम याचा अभाव जाणवला. गेल्या काही वर्षांत स्थानिक पातळीवर विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला आहे. झोपडपट्टीतील नागरिकांचे हक्क, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, कामगारांचे शोषण, शासकीय योजनांतील असमानता या अशा अनेक विविध मुद्द्यांवर संघटनेने रस्त्यावर उतरून आंदोलने केली, निवेदने दिली आणि जनतेशी थेट संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. आघाडीचे कार्यकर्ते विशेषतः युवकांमध्ये
उत्सुकता आहे. कार्यकारिणीची प्रत्येक वॉर्डातील काम सुरू आहे. ‘वंचित’कडून पक्ष संघटनेकडे लक्ष देण्यात आले आहे. त्याद्वारे पक्षविस्तार करण्याची तयारी आहे.

आप १२८ जागा लढवणार?
आम आदमी पक्ष (आप) आगामी महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढणार नाही. आप स्वबळावर सर्व ३२ प्रभागांत लढणार आहे, असे आपचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पक्षाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडीसाठी विशेष मानदंड निश्चित केले आहेत. या निर्णयामागे योग्य नेतृत्वाला संधी देण्याचा पक्षाचा हेतू आहे. आम आदमी पक्ष महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास अनेक प्रस्थापितांना ती डोकेदुखी ठरू शकते. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड भागातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आगामी काळात होणाऱ्या या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला सक्षम आणि पारदर्शक पर्याय म्हणून उभे करण्याचा त्यांचा कटाक्ष आहे. पक्षात नव्या चेहऱ्यांना वाव देणे, स्थानिक प्रश्नांवर प्रामाणिकपणे लढणे आणि प्रशासनाला उत्तरदायी बनवणे, या अजेंड्यावर पक्ष शहरात काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com