महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस भोपळा फोडणार !
पक्ष''नामा’ कॉंग्रेस
उमेदवारांची वानवा;
प्रयत्नांची पराकाष्ठा
 
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष तयारी करत आहे. मात्र, यापूर्वीचा पक्षाचा महापालिका निवडणुकीमधील आलेख घसरत आता शून्यावर आल्याचे दिसते. आगामी महापालिका निवडणूकही स्वबळावर लढविण्याच्या मानसिकतेत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसकडे आजही सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. गटबाजीची परंपरा आणि पक्षश्रेष्ठींकडून कायम दुर्लक्षित राहिलेल्या शहर काँग्रेसला आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे मात्र नक्की.
- अविनाश ढगे 
पिं परी चिंचवडमध्ये सर्वाधिक ताकदीचा पक्ष अशी काँग्रेसची ओळख होती. मात्र, गेल्या काही वर्षांत पक्षाची अवस्था दयनीय झाली आहे. तत्कालीन मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर प्रबळ नेतृत्व पक्षाला मिळालेच नाही. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. सर्व जागांवर उमेदवारही देता आले नव्हते. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही दुय्यम स्थान देण्यात आले. शहरात स्वतंत्रपणे लढण्यासारखी काँग्रेसची स्थिती नाही. तसेच स्वबळावर काही नगरसेवक निवडून आणू शकेल, असा नेताही नाही. पक्षश्रेष्ठी शहरात लक्ष घालतील, असेही निदर्शनास येत नाही. शहरातील पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणूकही राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षासोबत महविकास आघाडी म्हणून एकत्र की स्वतंत्र निवडणूक लढायची याबाबत शहर कॉंग्रेसमध्ये मतप्रवाह आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका झाल्या तर त्या ठिकाणी तिन्ही पक्ष काय भूमिका घेतात यावर बरेचसे भवितव्य अवलंबून आहे. तिनही पक्षांनी सर्वांना सामावून घेऊन लढाई लढली तर निश्चित पद्धतीने यश मिळू शकते. पक्षांतर्गत गटबाजी, विरोधकांची निवडणूक तंत्रे, महाविकास आघाडीचा समन्वय यांची योग्य सांगड घातल्यास येणाऱ्या काळात काँग्रेसला जनता साथ देऊ शकते आणि काँग्रेस पुढे येऊ शकते, असेही जाणकार सांगतात. एकंदरीतच कॉंग्रेसची झालेली वाहतात आणि भविष्यात असणारी आव्हाने यामध्ये कसा समन्वय स्थानिक नेतृत्वाकडून साधला जातो. यावर अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. या अनुषंगाने त्यांनी निर्णय प्रक्रिया राबवणे गरजेचे आहे. अन्यथा काँग्रेसला भोपळा ही फोडता येणे शक्य होणार नाही.
तेव्हाच पक्षाला अधोगती
महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्याच म्हणजे १९८६ च्या निवडणुकीत महापालिकेत कॉंग्रेसची एकहाती सत्ता आली होती. १९९७ च्या निवडणुकीत ४६ जागांवर विजय मिळवून बाजी मारली होती. १९९७ पर्यंत महापालिकेवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. १९९९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीच्या झंझावातापुढे काँग्रेस टिकाव धरू शकली नाही. २००२ च्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या ३१ जागा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ३६ जागा निवडून आल्या होत्या. पवारांना टक्कर देत राष्ट्रवादीच्या बरोबरीने काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणण्याची किमया प्रा. मोरे यांनी दाखवली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर शहर काँग्रेसला उतरती कळा लागली. २००७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाला केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले. केंद्रात आणि राज्यात कॉंगेसची सत्ता असतानाही २०१२ च्या महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसचे केवळ १४ नगरसेवक निवडून आले. २०१७ च्या निवडणुकीत भोपळासुद्धा फोडता आला नाही. त्यामुळे प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर पिंपरीतील काँग्रेस संपली अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.    
गळती रोखण्याचे आव्हान
महाविकास आघाडीत न जाता स्वबळावर लढण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. काँग्रेसच्या जिवावर मोठे झालेले अनेक नेते इतर पक्षांमध्ये गेले आहेत. आताही तीच स्थिती असून, पक्षातील गळती रोखण्याचे मोठे आव्हान आहे. 
काँग्रेसला सूर सापडेना 
पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये गट-तट असल्याने काँग्रेसला सूर सापडेनासा झाला आहे. त्यामध्येच थेट शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या विरोधातच एक गट सक्रिय आहे. कदम यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही शहराकडे दुर्लक्ष केले आहे.
गटबाजीची परंपरा जुनीच
शहर काँग्रेसला गटबाजीची जुनीच परंपरा आहे. टी. ए. तिरूमणी, सुरेश सोनवणे, नानासाहेब शितोळे, हनुमंत गावडे, श्रीरंग बारणे, भाऊसाहेब भोईर, सचिन साठे यांनी आतापर्यंत काँग्रेस शहराध्यक्षपदावर काम केले. प्रत्येकाने आपापल्या काळात गटबाजीचे राजकारण अनुभवले आहे. सध्याचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्यासमोरही तशीच परिस्थिती आहे. 
जनाधार देण्यात अपयश
शहरातील अनेक समस्यांना न्याय मिळवून देणे आणि पुन्हा काँग्रेसला जनाधार प्राप्त करणे अपेक्षित असताना ते तेवढे प्रमाणात घडले नसल्याचे दिसून येते. शहर नेतृत्व त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन प्रयत्न करतही असतील, मात्र त्याचा प्रभाव जनमत परिवर्तनावर झालेला नाही, असे चित्र शहरात आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

