दोन यंत्रणा, दोन योजना; दोघांचे तोंड दोन दिशांना
पिंपरी, ता. २९ : पुणे-नाशिक महामार्गावरील (एनएच-६०) नाशिक फाटा ते राजगुरुनगर (खेड) हा २८ किलोमीटरचा मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) होणार आहे. तर भक्ती-शक्ती (निगडी) ते चाकण मेट्रो मार्गदेखील याच भागातून जाणार आहे. पण, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) भक्ती शक्ती चौक ते चाकण मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा अर्थात ‘डीपीआर’ सादर केलेला नाही. त्यामुळे उन्नत मार्गाचे काम स्वतंत्रपणे सुरू करण्याची भूमिका ‘एनएचएआय’ने घेतली आहे. पण, एकाच मार्गावरुन दोन्ही पूल जाणार असल्यामुळे यांची कामे वेगवेगळी का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे- नाशिक महामार्ग रुंदीकरणाचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून लालफितीत अडकला आहे. या महामार्गावर दररोज मोशी ते राजगुरुनगर या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी वारंवार आंदोलने करून शासनाला निवेदने दिली आहेत. तरीही, गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. दिवसेंदिवस तो अधिकच गंभीर होत आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने नाशिक फाटा ते राजगुरूनगरपर्यंत आठ पदरी उन्नत आणि आठ पदरी जमिनीवर रस्ता प्रस्तावित केला आहे. यासाठी ‘एनएचएआय’ने सात हजार ८२७ कोटी रुपयांची निविदादेखील जाहीर केली आहे. ती२५ सप्टेंबरला उघडण्यात येणार होती. परंतु, तांत्रिक कारणास्तव ही प्रक्रिया आणखी महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे.
तर, दुसऱ्या बाजूला महामेट्रो प्रशासनाने निगडी ते चाकण हा मेट्रो मार्ग प्रस्तावित केला आहे. याचा ‘डीपीआर’ महामेट्रोने पिंपरी चिंचवड महापालिकेकडे सोपविला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने यात काही सुधारणा सुचविल्या आहेत. त्यानुसार बदल केले जात आहेत. त्यातच नाशिक फाटा ते चाकणपर्यंत मेट्रो आणि ‘एनएचएआय’चा उन्नत मार्ग समांतर असणार आहेत. पण, दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने या दोन्ही प्रकल्पांची कामे वेगवेगळी होण्याची चिन्हे आहेत. यामुळे खर्चदेखील वाढण्याची शक्यता आहे. तसेच वाहतूक कोंडीसह अन्य समस्या नागरिकांना सहन कराव्या लागणार आहेत. याबाबत ‘एनएचएआय’चे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ही स्थिती पाहता महामेट्रो आणि ‘एनएचएआय’ यांच्यात समन्वय असल्यास हे दोन्ही प्रकल्प नागरी सुविधांच्या तुलनेत एकत्र पुढे जाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नाशिक फाटा-चाकण दुहेरी उड्डाणपूल का नाही?
पुणे-अहिल्यानगर मार्गावर रामवाडी ते वाघोलीदरम्यान मेट्रोचे काम करतानाच वाहनांसाठी उड्डाणपुलासाठीची तयारी महामेट्रोकडून केली जाणार आहे. त्यानंतर दुमजली महामार्गाचे काम महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाकडून (एमएसआयडीसी) केले जाणार आहे. या प्रमाणेच महामेट्रो आणि ‘एनएचएआय’ यांच्यात समन्वय झाल्यास नाशिक फाटा ते चाकण दरम्यानही दुमजली उड्डाणपूल उभारता येऊ शकतो. यामुळे वेळ आणि पैशांची बचत होऊ शकते.
निगडी ते चाकण मेट्रो प्रकल्पाच्या ‘डीपीआर’मध्ये महापालिकेने काही सुधारणा सुचविल्या होत्या. त्याप्रमाणे कार्यवाही करुन ‘डीपीआर’ अंतिम केला जात आहे. त्यानंतर शासनाला कळवण्यात येईल.
- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
दृष्टीक्षेपात
निगडी ते चाकण मेट्रो मार्गाचे अंतर : ४१ किलोमीटर
उन्नत मार्गाचा संभाव्य खर्च : ७,८२७ कोटी रुपये
नाशिक फाटा ते राजगुरुनगर अंतर : २८ किलोमीटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

