महापालिकेत गरुड भरारी

महापालिकेत गरुड भरारी

Published on

पक्षनामा ः भारतीय जनता पक्ष
--


लीड
पिंपरी चिंचवड शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ पासून स्वतः लक्ष घातले आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग स्तरावर बैठका घेऊन वातावरण निर्मिती केली जात आहे. ‘जिंकण्याची ताकद असलेला जो येईल, तो आपला,’ असा अजेंडा भाजपने राबवला आहे. अजूनही इनकमिंग होण्याची शक्यता असून, पक्षाने दारे खुली ठेवल्याची चर्चा आहे.
- पीतांबर लोहार

पिं परी चिंचवड महापालिका अस्तित्वात आली तेव्हापासून २०१७ पर्यंत सत्ता मिळविण्यासाठी अस्तित्वाची लढाई लढणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. परंतु, २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पक्षाचे सरकार आले आणि परिवर्तनाची लाट आली, असे म्हटले जाते. त्याचे प्रतिबिंब शहरातही उमटले. कारण, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने १२८ पैकी ७७ जागांवर विजय मिळवत पक्षाचा झेंडा फडकविला. येत्या निवडणुकीतही एक हाती सत्ता मिळविण्याचे आणि महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना मिळून महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विरोधी पक्षनेते पदापासूनही ‘कोसो मैल दूर’ ठेवण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. त्यासाठी १२६ जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करून यंग ब्रिगेडला पक्षाने संधी दिली आहे.
नगरपालिका १९७२ मध्ये स्थापन झाली. लगतची गावे समाविष्ट करून ११ ऑक्टोबर १९८२ रोजी महापालिका अस्तित्वात आली. पहिली सार्वत्रिक निवडणूक १९८६ मध्ये झाली. लोकनियुक्त कारभाऱ्यांची सत्ता आली, पण एकतर्फी कॉग्रेसच्या हाती. भाजपचे फारसे अस्तित्व दिसले नाही. ही स्थिती पुढील तीन पंचवार्षिक निवडणुकीतही कायम राहिली. परंतु, १९९८-९९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे पुतणे तथा विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर संघटनेचे कामकाज सुरू झाले. महापालिकेच्या पुढील तीन निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. २००२, २००७ आणि २०१२ मध्ये त्यांना एक हाती सत्ता मिळाली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी लाट आणि भाजपचे नेते तथा तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय व्युहरचनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. भाजपने १२८ पैकी तब्बल ७७ जागांवर विजय मिळवला होता. निवडून आलेले पाच अपक्ष उमेदवारही भाजप समर्थक होते. यात भाजप नेते तथा मुख्यमंत्री फडणवीस यांची राजकीय मुत्सद्देगिरी कामी आली. तेव्हापासून शहरात भाजपचे प्राबल्य वाढत गेल्याचे तीन लोकसभा व तीन विधानसभा निवडणुकीत दिसून आले. सद्यस्थितीत शहरात पाचपैकी भाजपचे चार आमदार आहेत. दोन विधानसभा व दोन विधान परिषदेचे सदस्य आहेत. एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे खासदार शिवसेनेचे आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत. विद्यमान स्थिती बघता महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य अधिक आहे.

भाजपची वाटचाल
महापालिका १९८२ मध्ये अस्तित्वात आली. त्यापूर्वी दोनच वर्ष अगोदर म्हणजे १९८० मध्ये भाजपची स्थापना झाली होती. १९८२ पासून १९८६ पर्यंत प्रशासकांनी महापालिका कारभार बघितला. पहिली निवडणूक १९८६ मध्ये झाली. तेव्हा कॉंग्रेसची सत्ता आली. भाजपला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतरच्या निवडणुकांत म्हणजे १९९२ व १९९७ मध्ये भाजपला अनुक्रमे चार व सात जागांवर विजय मिळाला होता. २००२ च्या निवडणुकीत ११ जागांवर विजय मिळवला. शिवाय, दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीतही विजय मिळविल्याने संख्याबळ १३ झाले. मात्र, २००७ च्या निवडणुकीत ही संख्या नऊपर्यंत खाली घसरली. यापेक्षाही वाईट स्थिती २०१२ च्या निवडणुकीत झाली. अवघ्या तीन जागांवर भाजपने विजय मिळवला. २०१७ च्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत पक्षाने एकतर्फी सत्ता मिळवली.

दृष्टीक्षेप....
औद्योगिकनगरी असल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात कामगार चळवळ अर्थात लाला बावटाचे वर्चस्व होते. आता ती जवळपास संपुष्टात आली आहे. शहर काही अंशी भगवेमय झाले आहे. गावकी भावकीचे राजकारण पूर्वी होते. कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा हा वर्ग होता. कॉंग्रेसकडून राष्ट्रवादीकडे आणि आता राष्ट्रवादीकडून भाजपकडे वळला आहे. पूर्वी पक्षश्रेष्ठी निर्णय घ्यायचे, स्थानिक नेतृत्वाला फारशी संधी नसायची. आता भाजपच्या काळात स्थानिक नेतृत्व निर्णय घेत असतात. बेरजेचे राजकारण करून सर्व घटकांना समाविष्ट करत वाटचाल सुरू ठेवली. अमर साबळे यांना दिलेले खासदारपद (राज्यसभा सदस्य), उमा खापरे, अमित गोरखे यांना विधानपरिषद सदस्यत्व देऊन भाजपने मतदार स्वतःकडे वळवला. पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे अध्यक्षपद निष्ठावंताला देऊन भाजपची पाळेमुळे खोलवर रुजविण्याला प्राधान्य दिले. हिंदुत्वाबरोबरच विकासाचा अजेंडा राबवला. पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालय, स्मार्ट सिटी, अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट प्रकल्प, पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र तहसील कार्यालय हे सर्व भाजपच्या कार्यकाळात झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com