पिंपरी प्रदूषण दोन
प्रदूषित हवा ठरतेय दुषण
उद्योगनगरीतील कारवाईचा अभाव, पर्यावरणप्रेमी नाराज
पिंपरी, ता. १ ः कारखान्यांतून निघणारा धूर नियंत्रणासाठी बसवलेली उपकरणे योग्यरीत्या कार्यरत नसल्याने पिंपरी चिंचवड परिसरातील वायू गुणवत्ता सतत खालवत आहे. महापालिका पर्यावरण विभाग आणि एमआयडीसीचे निरीक्षण पथक अनेक वेळा भेटी देत असले, तरी प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासन उद्योगांना पाठीशी घालत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करीत आहेत. 
कारखाने व कंपन्यांमधून निर्माण होणारा ओला आणि सुका कचरा महापालिकेकडून नियमितपणे उचलला जातो. मात्र, घातक कचऱ्याबरोबरच घातक नसलेल्या कचऱ्याचे योग्य विघटन करण्याचा गंभीर प्रश्न उद्योजकांसमोर आहे. महापालिका हा कचरा उचलत नसल्याने उद्योजकांना तो विघटनासाठी रांजणगाव येथील खासगी कंपनीकडे पाठवावा लागतो. या प्रक्रियेसाठी संबंधित कंपनी मनमानी दर आकारत असल्याने उद्योजकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
कचरा साठवणूक
लांब अंतरावर कचरा नेण्याचा खर्च टाळण्यासाठी अनेक उद्योग तोच कचरा कंपनीच्या परिसरातच साठवून ठेवतात. सहा महिन्यांनी किंवा वर्षभरातून एकदाच तो विघटनासाठी रांजणगावला येथे पाठवला जातो. या कालावधीत साठवलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी, धूळ आणि रासायनिक प्रदूषण निर्माण होते. परिणामी, स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तरीही या समस्येकडे महापालिका आणि एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. 
दोषींवर कारवाईची मागणी
शहरातील पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी महापालिका आणि एमआयडीसीच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत तातडीने संयुक्त तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे. शहराचा औद्योगिक विकास आणि नागरिकांचे आरोग्य या दोन्हींसाठी प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलीचे कठोर पालन करण्याची गरज आहे.
(उत्तरार्ध)
घातक कचऱ्याचा प्रश्न गंभीर
एमआयडीसी परिसरातील प्रत्येक उद्योगातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी सुमारे १० ते १५ टक्के कचरा घातक स्वरुपाचा असतो. त्यात काच, बॅटरी, रबर, रंगाचे डबे, तेल, वंगण, रासायनिक पावडर, तुटलेले बल्ब, कीटकनाशके आणि जंतुनाशके यांचा समावेश होतो. हा कचरा योग्यरीत्या नष्ट न झाल्यास प्रदूषण आणि आरोग्याचे धोके निर्माण होतात. त्याचबरोबर ई-वेस्टमध्ये नादुरुस्त संगणक, मोबाईल, टीव्ही, बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश होतो. यात शिसे, पारा, कॅडमियमसारखे विषारी घटक असल्याने यामुळे माती, पाणी आणि हवा प्रदूषित होते. याच कचऱ्याचे विघटन करण्याची यंत्रणा शहरात नसल्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे.
---
तज्ज्ञ म्हणतात
- हवेतील धुलीकण, रासायनिक वायू आणि धूरामुळे श्वसनाचे आजार, दमा, फुप्फुसाचे विकार आणि हृदयविकाराच्या प्रमाणात वाढ
- औद्योगिक धूळ व रासायनिक घटक त्वचेवर ॲलर्जी, डोळ्यांची जळजळ आणि प्रतिकारशक्ती कमी होण्यास कारणीभूत
- दीर्घकाळ प्रदूषित वातावरणात राहिल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो
एमआयडीसीमधील वायूप्रदूषण
चालू वर्षातील सहा महिन्यांची आकडेवारी
महिने/ वायू निर्देशांक/प्रदूषित आहे/नाही
जानेवारी / १७९ / आहे
फेब्रुवारी /१५१ / आहे
मार्च / १९३ / आहे
एप्रिल / १०५ / आहे
मे / १०८ / आहे
जून / १०९ / आहे
जुलै /११४ / आहे
---
औद्योगिक क्षेत्रात कचरा जाळणे किंवा दूषित पाणी नदीत सोडणे अशा तक्रारी आल्यास पालिकेकडून कारवाई केली जाते. पण, प्रदूषणांबाबत कंपन्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे.
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

