मेट्रोचे काम अन् बेशिस्त रिक्षा चालकांमुळे वाहतूक कोंडी
पिंपरी, ता. १ : शहरातील महत्त्वाच्या चौकांपैकी एक असलेल्या निगडीतील लोकमान्य टिळक चौकातून दररोज हजारो वाहनचालक प्रवास करतात. मात्र, सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे रस्ते अरुंद झाले असून त्यात बेशिस्त रिक्षा चालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी काही मिनिटांचा प्रवास मोठ्या प्रतीक्षेचा बनत असून नागरिकांचे हाल होत आहेत.
हा चौक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर असून येथून आकुर्डी, निगडी प्राधिकरण, यमुनानगर, भक्ती-शक्ती चौकाकडे वाहने जातात. तसेच या चौकातच पीएमपीएमएलचा मुख्य थांबा असून परिसरात विविध दवाखाने, दुकाने, खासगी क्लासेस तसेच निगडी गावठाण आहे. त्यामुळे या चौकात नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते.
दरम्यान, या चौकात सध्या मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्याचा मोठा भाग बॅरिकेड्सने व्यापला आहे. एका लेनवरून वाहनांची ये-जा सुरू असताना रिक्षा चालकांकडून रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभ्या करणे, अनधिकृत ठिकाणी प्रवासी चढविणे-उतारणे, सिग्नल न पाळणे यांमुळे वाहतुकीवर परिणाम होतो. परिणामी आकुर्डी, निगडी प्राधिकरण, यमुनानगर, भक्ती-शक्ती चौक दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या कोंडीत वाहनचालक खूप वेळ अडकून पडतात.
वाहतूक शाखेचे कर्मचारी असतानाही अनेक रिक्षाचालक नियमांकडे दुर्लक्ष करतात. तसेच इतर बेशिस्त वाहन चालकही वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत सिग्नल सुटण्याआधीच वाहन दामटतात, झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येऊन उभे राहतात. यामुळे अनेकदा वाहतुकीचा बोजवारा उडत असून केवळ वाहनचालकच नव्हे तर पादचाऱ्यांनाही येथील रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे.
‘‘वाहतूक विभागाने बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई वाढवावी. मेट्रो कामाच्या ठिकाणी वाहतूक नियोजन सुधारावे तसेच, गर्दीच्या वेळी अतिरिक्त कर्मचारी तैनात करावेत. अन्यथा रोजच्या या वाहतूक कोंडीचा त्रास आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- प्रताप दहितुले, नागरिक
‘‘या चौकातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिस अंमलदारांची नेमणूक केली आहे. तसेच बेशिस्त रिक्षाचालकांसह इतर वाहनचालकांवर देखिल वेळोवेळी कारवाई केली जात असते. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.
- विजय वाघमारे, पोलिस निरीक्षक, निगडी वाहतूक विभाग

