‘जीएसटी’तून सूट, तरीही ग्राहकांची लूट

‘जीएसटी’तून सूट, तरीही ग्राहकांची लूट

Published on

पिंपरी, ता. ३ : सरकारने औषधांवरील वस्तू व सेवा करात (जीएसटी) कपात केली आहे. त्यामुळे २२ सप्टेंबरपासून औषधांवरील कर १२ वरून पाच टक्के झाले. पण, काही विक्रेते जुन्या दरानेच औषधांची विक्री करत आहेत. यातून ग्राहकांची लुट सुरू होत असल्याचा आरोप करत केला जात आहेत.

केंद्र सरकार आणि जीएसटी परिषदेने औषधे आणि वैद्यकीय उपकरणांवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला. यानुसार ३३ प्रकारची प्रामुख्याने कर्करोगावरील उपचाराची इतर दुर्मिळ जीवनावश्‍यक औषधे करमुक्त करण्यात आली. तर, इतर औषधांवरील जीएसटी १२ वरून पाच टक्के करण्यात आला. वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटीही पाच टक्के केला आहे. त्यामुळे बदललेल्या जीएसटी दरानुसार औषधांच्या किमतीत बदल करून विक्री बंधनकारक आहे. सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी औषध विक्रेत्यांनी करणे आवश्यक आहे. पण, काही ठिकाणी जुन्या दरानेच विक्री केली जात आहे. याबाबत विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप ग्राहक करत आहेत. परिणामी, सरकारच्या निर्णयाचा ग्राहकांना लाभ होत नसेल तर काय उपयोग? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

औषध विक्रेत्यांना परतावा मिळणार
‘‘जीएसटी दर बदलामुळे व्यवसाय क्षेत्रावर अचानक आर्थिक परिणाम झाला आहे. औषध विक्रेत्यांना जीएसटी क्रमांक आहे, त्यांना परतावा मिळणार आहे. पण, मागील स्टॉक आम्ही १२ टक्के जीएसटी भरून घेतलेला आहे. आता बाजारभाव पाच टक्के ‘जीएसटी’च्या आधारावर कमी करावा लागतो. यामुळे छोट्या व मध्यम उद्योगांना तत्काळ आर्थिक नुकसान होत आहे. सरकारने हा निर्णय ग्राहकांच्या फायद्यासाठी घेतला, हे स्वागतार्ह आहे. मात्र, व्यापाऱ्यांच्या पूर्वखरेदी व स्टॉकवरील नुकसानीबाबत स्पष्ट मार्गदर्शक योजना आणि नुकसानभरपाईची तरतूद आवश्यक आहे. सरकारने व्यापाऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करून या नुकसानीची भरपाई करावी आणि आवश्यक वित्तीय मदत किंवा इनपुट क्रेडिट समायोजनाची घोषणा करावी. अंमलबजावणीसाठी व्यापाऱ्यांचे हितही संरक्षणात यावेत,’’ अशी भूमिका केमिस्ट असोसिएशन मांडली आहे.


मी नियमित आणि त्वचेच्या संबंधित आजारांची औषध घेण्यासाठी गेले, परंतु मला जुन्या दरानेच औषधे मिळाली आहेत. नव्या निर्णयानुसार औषधांच्या किंमतीत बदल करणे अपेक्षित आहे.
- रेजिना वाझ, ग्राहक, पिंपरी

औषधांवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे, त्यानुसार विक्री करायची आहे. आम्ही सर्व औषध विक्रेत्यांना सूचना केली आहे. पत्र दिली आहेत. तरीही औषध विक्रेत्याकडून जादा दराने आकारणी होत असेल, किंवा एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री करत असेल तर बिल घ्यावे.
- विवेक तापकीर, उपाध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन, पुणे जिल्हा

नव्या ‘एमआरपी’प्रमाणे औषध विक्री करत आहोत. जीएसटी कमी झाल्‍यामुळे मधुमेह आणि क्षयरोगावरील औषध घेणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळत आहे. दर कमी झाल्याचा फायदा होत आहे. ग्राहकांना बिल देण्यात येतात.
- भावेश जैन, औषध विक्रेते, अजमेरा कॉलनी

औषधांचे नाव - जुने दर - नवीन दर
मायकोपास - ९८६.१५ - ६७६.२२
टेरिकॉक्स - १,०५४ - ६७७.५७
डायड्रॉवेल - ५९८.९५ - ३८५
डायड्रॉवेल एसआर २० - ७०० - ४५०
सेन्सिक्लाव ३७५ - १८६.६९
ट्रेनाक्सा एमएफ - ५८५ - ३७६
डेमिता १० - १८०.२५- ११५.८८
जेमिनॉर एम४ फोर्ट - २८०.५० - १८०
जेमिनॉर एमएस १/५०/५०० - ११५ - ७३
डॅपमॅक ट्रायओ - १९६ -१२६
रुबिरेड एफसीएम -१,८०० - १,१५७
ओरॅटिल सीव्ही ५०० - ९४२ - ६०५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com