पदवीधारकांना बनावे लागले चालक-वाहक
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३ ः कुणी एम. ई. इलेक्ट्रॉनिक्स, कुणी संगणक अभियंता, कुणी बी. ई. मेकॅनिकल, कुणी एमबीए, तर कुणी एल. एल. एम. ही उल्लेखनीय पात्रता असलेले युवक-युवती एखाद्या आयटी अथवा बहुराष्ट्रीय कंपनीचे अधिकी नाही, तर ते आहेत चक्क ‘पीएमपीएमएल’चे वाहक किंवा चालक. हाताला रोजगार नसणे, पोट हातावरचे असणे, तसेच घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांना ‘पीएमपी’ची नोकरी स्वीकारणे भाग पडले. ‘पीएमपी’मध्ये असे तब्बल २२५ पेक्षा जास्त अधिक उच्चशिक्षित युवक-युवती वाहक किंवा चालक म्हणून काम करीत आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या ‘पीएमपी’मध्ये सुमारे आठ हजार कर्मचारी आहेत. यात दोन हजार ५५० चालक आणि तीन हजार ५९२ वाहक आहेत. यातील बहुतांश चालक आणि वाहक हे उच्चशिक्षित आहेत. शासकीय अधिकारी, वैमानिक, अभियंता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. दिवसेंदिवस स्पर्धा तीव्र होत असल्याने आणि रोजगाराच्या संधी कमी होत असल्याने अनेकांना ‘पीएमपी’मध्ये नोकरी पत्करावी लागली.
‘पीएमपी’मध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, कार्यालयीन अधिक्षक, वरिष्ठ अधिक्षक, सहाय्यक अधिक्षक, मुख्य वाहतूक निरीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, नियंत्रक-तपासनीस, मुख्य तंत्रज्ञ, फिटर, हेल्पर दोन, हेल्पर एक, क्लीनर अशी विविध कार्यालयीन पदे आहेत. याशिवाय मुख्य वाहतूक व्यवस्थापक, मुख्य अभियंता, जनसंपर्क अधिकारी, लेखापाल, भांडार अधिकारी, सिव्हिल इंजिनिअर, आगार मेंटेनन्स अभियंता, आगार व्यवस्थापक, सहाय्यक आगार व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, विधी अधिकारी, खातेनिहाय चौकशी अधिकारी, स्वच्छता अधिकारी आदी अधिकाऱ्यांची पदे आहेत. यातील बहुतांश पदे रिक्त आहेत.
‘पीएमपी’साठी सुमारे ११ हजार पदे मंजूर आहेत, पण सध्या केवळ सात हजार ९०० कर्मचारी कार्यरत आहेत. ‘पीएमपी’चा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून बसेसची संख्या देखील वाढत आहे. ‘पीएमपी’मधून वर्षाला साधारण २०० ते २५० कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र भरती प्रक्रिया होत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून विविध पदे रिक्त असल्याने ‘पीएमपी’च्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होत आहे. चालक आणि वाहकांमधील उच्च शिक्षित तरुणांना रिक्त पदावर काम करण्याची संधी देणार की सरळ सेवेमधून भरती करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिक्षणनिहाय कर्मचारी
एम. ई. इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन १
सॉफ्टवेअर इंजिनिअर १
बी.ई. मेकॅनिकल इंजिनिअर ३
एम. पी. एस. सी. मुख्य परीक्षेस पात्र २
एम. बी. ए. ७
बी. ए. एल. एल. बी. ९
पदविका २०
एल. एल. एम. ३
एम. पी. एम. १
बी. एस्सी ६
बीसीए/बीसीएस ८
बी. कॉम/ एम. कॉम २२
एम. एस्सी २
एम. ए. ७४
बी. ए, आयटीआय, पीएच.डी, सॅनिटरी इन्स्पेक्टर व इतर - ६६
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

