शिवभोजन केंद्र चालकांची थाळी ‘रिकामीच’

शिवभोजन केंद्र चालकांची थाळी ‘रिकामीच’

Published on

पिंपरी, ता. ४ ः तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली शिवभोजन केंद्रे शेवटची घटका मोजण्याच्या मार्गावर आहे. तब्बल ९ महिन्यांपासून त्यांची देयके अदा करण्यात आली नाहीत. त्यामुळे त्यांची थाळी ‘रिकामीच’ राहिल्याचे दिसून येत आहे.
कोणीही उपाशी राहू नये, याकरिता तत्कालीन महाविकास आघाडी सरकाने राज्यात शिवभोजन केंद्रे सुरू केली. केवळ १० रुपयांत पोटभर जेवण देण्यात येणार होत होते. उर्वरीत पैसे शासन देणार होते. त्या अनुषंगाने शहरात एकूण १४ शिवभोजन थाळी केंद्रे आतापर्यंत कार्यरत आहेत. त्यामध्ये ‘अ’ परिमंडळ कार्यालयाअंतर्गत (चिंचवड) सर्वाधिक म्हणजे ८, ‘ज’ परिमंडळ कार्यालया (पिंपरी) अंतर्गत ४ आणि ‘फ’ परिमंडळ कार्यालया अंतर्गत (भोसरी) २ शिवभोजन केंद्रांचा समावेश आहे.
सुरुवातीला केंद्र चालकांना नियमित देयके अदा केली जात होती. मात्र, मागील ९ महिन्यांपासून अनुदान वितरण पूर्णतः ठप्प पडले आहे. स्वखर्चातून केंद्र चालक सर्वसामन्यांना थाळी उपलब्ध करून देत आहे. मध्यंतरी केवळ ४५ लाख १६ हजार रुपये पुरवठा विभागाला प्राप्त झाले होते. त्यातून मोजक्याच केंद्र चालकांची देयके निकाली काढण्यात आली. शिवभोजन केंद्र चालकांची ओरड लक्षात घेऊन नागरी अन्न धान्य पुरवठा विभागाने शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्या मागणीनुसार शहराला दिवाळीपूर्वीच एक कोटी ३५ लाख रुपये प्राप्त होणे गरजेचे होते. परंतु दिवाळीपूर्वी देयके करण्यात आलेच नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्र चालकांची दिवाळी अंधारात गेल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यासंदर्भात शासन आणि प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी शिवभोजन केंद्र चालकांनी केली आहे.

साडेबाराशे थाळींचे वितरण
शहरातील १४ शिवभोजन केंद्रांतून दैनंदिन जवळपास साडेबाराशे थाळींचे वितरण होते. केंद्र चालकांना कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच अन्नधान्याकरिता स्वतः खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शिवभोजन चालकांसमोर मोठी आर्थिक चणचण निर्माण झाली आहे.

राज्य शासनाने लवकरात लवकर अनुदान द्यावे. अन्यथा पुढील महिन्याभरात शिवभोजन केंद्र बंद करण्याची वेळ आमच्यावर येणार आहे. खर्च खूप आहे. पण, अनुदान वेळेत येत नसल्याने आर्थिक ताण येत आहे.
- रामचंद्र साबळे, शिवभोजन केंद्र चालक

राज्य शासनाकडून निधी येत नसल्यामुळे शहरातील शिवभोजन केंद्रांचे अनुदान वितरण बंद आहे. शासनाकडून पैसे आल्यास ते शिवभोजन केंद्र चालकांना तत्काळ दिले जातील.
- डॉ. विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, चिंचवड

परिमंडळ कार्यालय - शिवभोजन केंद्र - थाळी संख्या
अ - ८ - ७५०
ज - ४ - ३००
फ - २ - २००

Marathi News Esakal
www.esakal.com