पदाधिकारी, कार्यकर्त्यांत
कमालीची शांतता

पदाधिकारी, कार्यकर्त्यांत कमालीची शांतता

Published on

पक्ष''नामा’ ः शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
---------
पदाधिकारी, कार्यकर्त्यांत
कमालीची शांतता

स्था निक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांतर्गत परस्पर विरोधी घडामोडी घडताना पाहायला मिळत असल्या तरी पिंपरी चिंचवड शहर पातळीवर मात्र दोन्ही पक्षांमध्ये शांतता आहे. सत्तेचे वलय असल्यामुळे शिवसेना स्थानिक पातळीवर बलाढ्य वाटत असली तरी आगामी निवडणुकीत त्यांना विरोधकांसह मित्र पक्षांच्या प्रतिस्पर्धकांचा सामना करावा लागणार आहे.
- अमोल शित्रे

पिं परी चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक जकीय पक्षांच्या आणि स्थानिक आघाड्यांच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत. स्थानिक पातळीवर शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांत मात्र, कमालीची शांतता आहे. राज्य पातळीवर दोन्ही पक्षात कायम संघर्ष पाहायला मिळतो. तसे चित्र स्थानिक पातळीवर दिसत नाही. त्यामुळे दोन्ही पक्षात सर्वकाही अलबेल असल्याचा संशय बळावत चालला आहे. २०१२ च्या निवडणुकीनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेचे १४ नगरसेवक होते. यात पाचने घट होऊन २०१७ च्या निवडणुकीत ते नऊ राहिले. आता या पक्षाचे दोन वेगवेगळे पक्ष झाले आहेत. त्यामुळे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते विभागले गेल्यामुळे पक्षाची ताकद विखुरली गेली आहे. शिवसेनेला सत्तेचे वलय असल्यामुळे शहरातील मोठमोठे नेते या पक्षासोबत सत्तेत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आजपर्यंत थांबलेले काही नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना सोडून शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कार्यकर्त्यांची पोकळी निर्माण झाली आहे. मात्र मतदार कायम असल्याचे बोलले जात आहे. परंतु, त्यांची संख्या शहराच्या ३० लाखांवरील लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य असल्याचे बोलले जात आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना कसरत करावी लागत आहे. पक्षफुटीमुळे अनेक निष्ठावंत पक्ष फोडणारांवर नाराज आहे. उघडपणे ते नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. याउलट राज्याच्या सत्तेत प्रत्यक्ष सहभाग असल्याने शहरातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षाकडे ओघ असल्याने उमेदवार निवडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला संघर्ष करावा लागणार आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष स्वतंत्र लढल्यास हा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची डोकेदुखी ठरणार आहे.

पक्ष बांधणीसाठी कसरत
पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षापेक्षा अधिक ताकद शिवसेनेची होती. तीन वेळा आमदार आणि तीन वेळा पक्षाचा खासदार शहरात होता. पक्ष फुटीनंतरही लोकसभेला पक्षाच्या उमेदवारांनी मित्र पक्षाच्या उमेदवारांना चांगली साथ दिली. परंतु, महापालिका निवडणुकीसाठी फार अशी तयारी दिसत नाही. शिवाय, पिंपरी चिंचवड शहर पातळीवर पक्ष बांधणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी प्रत्यक्ष कोणताही कार्यक्रम अथवा कोणताही उपक्रम होताना दिसत नाही.

प्रभागात बदल
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मधील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. मात्र, आताच्या प्रभाग रचनेत प्रभाग २४ मधील अनुसूचित जाती प्रवर्गासाठीचे आरक्षण रद्द होण्याची शक्यता आहे. कारण, प्रभाग रचनेमध्ये अनुसूचित जातीची संख्या अधिक असलेला प्रभाग २४ मधील म्हातोबानगर भाग प्रभाग २५ ला जोडला आहे. त्यामुळे प्रभाग २४ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होऊ शकणार नाही. परिणामी, २०१७ च्या निवडणुकीत विजयी झालेला शिवसेनेच्या उमेदवाराला हक्काच्या जागेवर पाणी सोडावे लागणार आहे. शिवाय, नगरसेवक काळात त्यांनी प्रभागात केलेल्या विकास कामांवरही पाणी फिरण्याची चिन्हे आहेत. या प्रभागात आता शिवसेनेची सर्वसाधारण पुरुष ही एकमेव जागा सुरक्षित मानली जात असली तरी मागील पंचवार्षिक निवडणुकीत केलेल्या विकासकामांच्या आधारावरच तेथील मतदार उमेदवाराला कौल
देणार आहेत का? हा प्रश्न निवडणुकीनंतरच सुटणार आहे. शिवाय, प्रभाग २५ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तीन हक्काच्या जागा आहेत. मात्र, मागील विकासकामांबाबत नाराजी असल्याने या जागा टिकविण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कितपत यश मिळणार हाही प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. प्रभाग १८ मधील या पक्षाची जागा सुरक्षित मानली जाते. तर, प्रभाग १५ मधील जागेबाबत साशंकता आहे. तरी दोन्ही पक्षांना जास्तीच्या जागा निवडून आणण्यासाठी परस्परविरोधात संघर्ष करावा लागणार आहे.

वातावरण निर्मितीत मागे
- शिवसेना राज्यात सत्तेत असल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात वातावरण निर्मिती करण्यासाठी स्थानिक नेत्यांच्या आग्रहाखातर राज्य पातळीवरील कार्यक्रम येथे घेतले जातात. त्याचबरोबर पक्षाचे मंत्री, नेते अधून-मधून शहरात भेटी देतात. त्यामुळे शिवसेनेचे काही प्रमाणात सकारात्मक वातावरण आहे.
- याउलट वातावरण निर्मितीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यक्रम होताना दिसत नाहीत. शिवसेनेच्या नेत्यांची महायुतीसोबत २५ ते ३० जागा लढण्याची तयारी आहे. तर, महाविकास आघाडीसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी ३५ ते ४० जागा लढण्याचा मानस व्यक्त केला आहे.
- उमेदवार मिळवण्यासाठी शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोन्ही पक्षाचा कस लागणार आहे. दोन्ही पक्षाकडून विभाग स्तरावर, बुथस्तरावर मतदार यादी तपासण्यापासून ते पक्षबांधणीपर्यंत कामाला सुरुवात झाली आहे, हीच त्यांची जमेची बाजू दिसते.

सत्तेचा फायदा व तोटा
- शिवसेना सत्तेत असल्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने शहरातील प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद दिलेली जाते. त्या जोरावर शाखाप्रमुख सुद्धा लोकांची कामे मार्गी लावत आहेत. त्यामुळे शहरात निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणाचा येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे.
- दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सत्तेबाहेर असल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. उद्धव ठाकरे यांच्या प्रेमापोटी थांबलेले काही नेते व कार्यकर्ते तटस्थ आहेत. पक्षाचा कसलाही फायदा होत नसताना ते ठाकरे यांच्यासोबत टिकून आहेत.
- लोकांची कामे करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे वा त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांच्याकडे ताकद नसल्याने त्यांना थेट नागरिकांसमोर जाणे कठीण जात आहे. त्यामुळे सहाजिकच लोकांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली असल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com