भरधाव मोटारीने तीन दुचाकींना ठोकरले चिंचवडची घटना; सातजण जखमी, एकजण पुलावरून खाली कोसळला
पिंपरी, ता. १६ : भरधाव मोटारीने तीन दुचाकींना ठोकरल्याने त्यावरील सहा जण जखमी झाले. या अपघातात एका दुचाकीवरील तरुण पुलावरून खाली कोसळला. जखमींपैकी एका दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक आहे. मोटार चालकही जखमी झाला आहे. ही घटना चिंचवडच्या दळवीनगर येथील लोहमार्ग उड्डाणपुलावर शनिवारी (ता. १५) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
सोमेश्वर श्रीधर काळे (वय २१, रा. हनुमान मंदिरामागे, आकुर्डी), अक्षय सुरेश बाटे (वय २२, रा. हनुमान मंदिरामागे, आकुर्डी), राजेंद्र मनोहर वराडे (वय ५५), शुभदा राजेंद्र वराडे (वय ५१, दोघे रा. महात्मा फुलेनगर, चिंचवड), चैतन्य पुराणिक (वय ४०) आणि पद्मजा पुराणिक (वय ४२) अशी जखमींची नावे आहेत. जखमींपैकी वराडे दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक आहे. काळे यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटारचालक समर्थ मंदार कुलकर्णी (वय १९, रा. सृष्टी सोसायटी, रावेत) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तोही जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
साते (ता. मावळ) येथील महाविद्यालयात बीटेकच्या दुसऱ्या वर्षात समर्थ शिक्षण घेत आहे. त्याचा मित्र विश्वास शांताराम टेमगिरे (वय ३२, रा. नेचर पार्क सोसायटी, रावेत, मूळगाव शिंदे वासुली, ता. खेड) याची रावेतमधील चिंतामणी चौकात डेअरी आहे. समर्थ त्याच्या डेअरीवर जायचा. शनिवारी रात्री विश्वासच्या मोटारीतून आकुर्डी येथे पान खाण्यासाठी व वस्तू खरेदीसाठी दोघे आले होते. तेथून परतताना समर्थ मोटार चालवत होता. दरम्यान, फिर्यादी सोमेश्वर व त्यांचा मित्र अक्षय हे दुचाकीवरून चिंचवडहून खंडोबा माळ चौकाकडे जात होते. याचवेळी दळवीनगर पुलावर समर्थ चालवत असलेल्या भरधाव मोटारीने सोमेश्वर यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये सोमेश्वर यांच्या दुचाकीवर मागे बसलेला अक्षय दुचाकीवरून उडून पुलाच्या खाली कोसळला. सोमेश्वरच्या मागून येणाऱ्या राजेंद्र आणि शुभदा वराडे यांच्या दुचाकीला मोटारीची धडक बसली. त्यानंतर मोटारीने चैतन्य आणि पद्मजा पुराणिक यांच्या दुचाकीलाही धडक दिली. सोमेश्वर व अक्षय गंभीर जखमी आहेत. राजेंद्र आणि शुभदा यांच्या डोक्याला मार लागला असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
‘‘समर्थ कुलकर्णी याच्याविरुद्ध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक दृष्ट्या त्याने मद्यपान केले नसल्याचे समोर येत आहे. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अधिक तपास सुरू आहे.
- मकसूद मणेर, पोलिस उपनिरीक्षक
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

