तब्बल २९७ सहकारी संस्था अवसायानात
प्रदीप लोखंडे - सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १९ : उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाच्या सर्वेक्षणात काही संस्था बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. केवळ कागदोपत्री नोंद असलेल्या व प्रत्यक्षात कामकाज बंद असलेल्या सहकारी संस्थांवर आता शासकीय दप्तरी फुली मारली जाणार आहे. त्यानुसार शहरातील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय क्र. तीन व क्र. सहा अंतर्गत २९७ संस्था अवसायनात निघाल्या आहेत; तर ७१ सहकारी संस्थांच्या कामकाजात अनियमितता आढळलेली आहे.
राज्याच्या सहकार विभागाने सहकारी संस्थांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत प्रशासनातील आणि लेखापरीक्षण विभागातील पथक नियुक्त करण्यात आले होते. संस्थांबाबत एकत्रित अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर केला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सहकारी संस्था उपनिबंधक (सहकारी संस्था) क्र. तीन आणि क्र. सहा या कार्यालयांच्या अखत्यारित येतात. या दोन्ही कार्यालयांतर्गत एकूण ७ हजारांहून अधिक संस्थांची नोंदणी झाली आहे. उपनिबंधक सहकारी संस्था क्र. तीन अंतर्गत चार हजार २७० सहकारी संस्थांची नोंदणी झाली असून यामध्ये २२६ संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. तर कार्यालय क्र. सहा अंतर्गत तीन हजार २२४ संस्थांची नोंदणी झाली असून ७१ सहकारी संस्थांच्या कामकाजात अनियमितता आढळलेली आहे.
अवसायनाची कारवाई
एखाद्या सहकारी संस्थेने लेखा परीक्षण केले नाही, समिती स्थापन केलेली नाही, नियमित कामकाज नसणे, विवरण पत्र प्राप्त नसणे अशा संस्था अवसायनात काढल्या जातात. या संस्थांना अवसायनपूर्व नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यावर रीतसर कागदपत्रे दाखल करून खुलासा न केल्याने या संस्था अवसायनात काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. या संस्थांना मुदत देऊन कामकाज सुरू असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. अन्यथा या संस्थांची पुढील कायदेशीर प्रक्रिया पार केल्यानंतर नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.
सहकारी संस्थांची नोंदणीकृत आकडेवारी
संस्थांचा प्रकार / उपनिबंधक कार्यालय क्र. तीन / उपनिबंधक कार्यालय क्र.सहा
१) गृहनिर्माण संस्था / ३९९८ / ३२२४
२) नागरी पतसंस्था / ७५ / ११७
३) नोकरदार सहकारी पतसंस्था / २९ / ७८
४) इतर / ८९६ / २७०
कोणत्या संस्था अवसायनात ?
१) उपनिबंधक कार्यालय क्र. तीन
या कार्यालयांतर्गत २२६ सहकारी संस्था अवसायनात काढल्या आहेत. त्यामध्ये गृहनिर्माण संस्था ११६, नागरी सहकार पतसंस्था ३५, सेवक सहकारी पतसंस्था ७, औद्योगिक सहकारी संस्था १०, उद्योजकांसाठीच्या प्रिमायसेस सहकारी संस्था ४, ग्राहक सहकारी पतसंस्था १०, स्वयंरोजगार संस्था ३६, मजूर संस्था ६, वाहतूक संस्था २ आदींचा समावेश आहे.
२) उपनिबंधक कार्यालय क्र. सहा
या कार्यालयांतर्गत ७१ सहकारी संस्था अवसायनात निघाल्या आहेत. त्यामध्ये सहकारी पतसंस्था २, औद्योगिक / प्रक्रिया / विकास / खरेदी विक्री संघ २, इतर संस्था ६७ आदींचा समावेश आहे.
ज्या सहकारी संस्थांचे कामकाज अनेक दिवसांपासून बंद आहे. तसेच लेखा परीक्षण अहवाल अथवा इतर माहिती कार्यालयाकडे जमा केलेली नाही. अशा संस्थांची तपासणी केली जाते. त्यांना कामकाज सुरू असल्याबाबत कळविण्याची नोटीस पाठवली जाते. त्याचे उत्तर प्राप्त न झाल्यास संस्था अवसायनात काढल्या जातात. त्यानंतर ही सकारात्मक प्रतिसाद न आल्यास संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई केली जाते.
- मुकूंद पवार, उपनिबंधक, सहकारी संस्था (क्र.६) पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

